शेअर रिक्षाचे प्रति सीट भाडे २० रुपये ही प्रवाशांची लूटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:35 PM2021-01-14T23:35:14+5:302021-01-14T23:35:48+5:30
तेजस्विनी प्रवासी संघटना : १५ रुपये आकारण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. अनलॉकमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी अवघ्या दोन प्रवाशांसह रिक्षा व्यवसायाला परवानगी देण्यात आली. मात्र, शेअर भाडे घेणारे रिक्षाचालक आरटीओच्या मान्यतेनुसार, पहिल्या टप्प्यासाठी पूर्वीच्या १० रुपयांऐवजी २० रुपये घेत आहेत. वास्तविक, हे संयुक्तिक नाही. तीनऐवजी दोन प्रवासी म्हणजे आधीच्या १० रुपये भाड्याएवजी दोन प्रवासी प्रत्येकी १५ रुपये भाडे द्यावे, असा निर्णय व्हायला हवा, पण तसे नसल्याने सर्वसामान्यांची ही लूट होत आहे. ती थांबविण्यात यावी, अशी मागणी तेजस्विनी प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.
अरगडे म्हणाल्या की, ‘शेअरने तीन प्रवाशांचे आधी तर नऊ रुपयेप्रमाणे २७ रुपये घेतले जात होते, तर स्वतंत्र रिक्षा केल्यास २० रुपये घेतले जायचे, पण आता त्या जागी ४० रुपये म्हणजे थेट डबल भाडे आकारले जाते, हे संयुक्तिक नाही. याबाबत आरटीओने पुन्हा विचार करायला हवा. सामान्य नागरिकांचेही हाल सुरू आहेत. त्यांच्याकडेही पैसे नाहीत. अनेकांचे नोकरीधंदे गेले आहेत, त्यांचाही विचार करायला हवा.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘बहुतांश रिक्षाचालक तीन प्रवासी घेतात. एखादाच दोन प्रवासी घेत असेल, पण भाडे कोरोना काळात ठरवून दिले आहे ते घेतात, हे नियमबाह्य आहे. आरटीओ यावर कारवाई करत नाही. त्यामुळे शेअरला तीन प्रवासी घेतले, तर पहिल्या टप्प्यासाठी १० रुपये, तर दोन प्रवासी घेतले १५ रुपये प्रति सीट आकारावेत. सामान्यांचाही विचार करावा.’
‘प्रसंगी आंदोलन करू’
आरटीओ, रिक्षाचालक याबाबत सुधारणा करणार नसतील, तर त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी लागणार आहे. वेळ पडल्यास प्रवासी हितासाठी आंदोलनाचा पवित्राही घ्यावा लागल्यास, त्यासाठी तयारी असल्याचे अरगडे म्हणाल्या.