शीळफाटा ते भिवंडी मल्टी लेव्हल प्रकल्प तयार करण्यात येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
By मुरलीधर भवार | Published: November 13, 2022 11:21 PM2022-11-13T23:21:18+5:302022-11-13T23:21:55+5:30
आम्ही गेम चेजर प्रकल्प राज्यात आणले आहेत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही असा टोला शिंदेंनी लगावला.
डोंबिवली-शीळ फाटा ते भिवंडी या मार्गावर नागपूरच्या धर्तीवर मल्टी लेव्हल प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
४४५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची जाहिर सभा डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली परिसरात पार पडली. या प्रसंगी मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, रस्ते या शहराच्या रक्तवाहिन्या आहे. त्यांचा विकास योग्य प्रकारे झाल्यास उद्योग व्यापाराला चालना मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युती सरकारच्या काळात उड्डाणपूल तयार केले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तयार केले. त्यावेळी याची गरज का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आत्ता तेच पूल आणि मार्ग कमी पडत आहे. राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे आमचे सरकार असून रस्ते वाहतूकीची सक्षम जाळे राज्यात विणले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांचा राजकीय समाचार घेताना शिंदे म्हणाले की, आम्ही गेम चेजर प्रकल्प राज्यात आणले आहेत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. आम्ही ५० खोके घेतले नसून आणि २०० खोके देतो. १ हजार खोके विकासासाठी दिले आहेत. टिका करणाऱ्यांनीही माहिती आहे की, एकनाथ शिंदे घेणारा नाही तर देणारा आहे. मा्झ्या पोटात बरेच काही आहे. मी ते काढू इच्छीत नाही.ते हळूहळू काढणार आहे. माझ्यावर विश्वास ठेऊन आत्ता गजानन किर्तीकर आमच्याकडे आले. तर त्यांनीही खोके घेतले का त्यांनीही गद्दारी केली का असा सवाल शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही. आमचा अजेंडा महाराष्ट्र विकासाचा आहे. अनेकांनी ठाकरे यांना भूमिका बदला असे सांगितले. मात्र त्यांना केवळ स्वार्थ दिसतो. ते भूमिका कशी काय बदलणार असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.