कल्याणमधील शीतला देवीला तब्बल १५० वर्षांची परंपरा; तीन पिढ्यांपासून केली जाते पूजाअर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 10:22 AM2023-10-18T10:22:15+5:302023-10-18T10:22:39+5:30

नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीला अभिषेक केला जातो. नऊ दिवस देवीचे पाठ वाचले जातात.

Sheetla Devi in Kalyan has a tradition of almost 150 years; The worship has been done for three generations | कल्याणमधील शीतला देवीला तब्बल १५० वर्षांची परंपरा; तीन पिढ्यांपासून केली जाते पूजाअर्चा

कल्याणमधील शीतला देवीला तब्बल १५० वर्षांची परंपरा; तीन पिढ्यांपासून केली जाते पूजाअर्चा

- मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रसिद्ध शीतला देवीचे मंदिर आहे. हा चौक तयार होण्यापूर्वी या भागाची शीतला देवी ही भौगोलिक खूण (लँडमार्क) होते व आजही आहे. शीतला देवी मंदिर हे १५० वर्षे जुने आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून याठिकाणी शीतला देवीची पूजाअर्चा केली जाते.

गोविंद गणपत पानेरकर (कुंभार) हे या देवीची सुरुवातीला उपासना आणि पूजा करीत होते. ते घेसर येथील असले तरी ते कल्याणच्या मुख्य बाजारपेठ परिसरात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पूजा करण्याचा मान त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर पानेरकर यांच्याकडे आला. 

देणगीतून मंदिराची होते दुरुस्ती
नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीला अभिषेक केला जातो. नऊ दिवस देवीचे पाठ वाचले जातात. नवमीला नवचंडिका होम असतो. मंदिरात शीतला देवीच्या मूर्ती शेजारी गावदेवीची मूर्ती आहे. कल्याणची गावदेवी अर्थात ग्रामदैवत शीतला देवीच्या सोबत पुजली जाते. भक्तांनी दानपेटीत टाकलेले पैसे आणि स्वखुशीने दिलेल्या देणगीतून मंदिराची देखभाल, दुरुस्ती आणि रंगरंगोटी, प्रसाद, देवीच्या पूजनाचा खर्च भागवला जातो.

    आता गुरुनाथ पानेरकर हे देवीची पूजा करतात. वंश परंपरागत देवीचे पूजन सुरू आहे. शीतला देवी ही स्वयंभू आहे. देवीच्या बाबतीत एक आख्यायिका आहे. देवी जेव्हा तहान-भुकेली होती तेव्हा तिला कुंभारांनी दही, दूध, भात आणि पाणी दिले होते. 
    त्यावेळी शीतला देवी प्रसन्न झाली. तिची सेवा कुंभारांकडून केली जाईल, असे त्याच वेळी तिने जाहीर केले. गुरुनाथ पानेरकर हे मूळचे कुंभार. आता त्यांचा व्यवसाय कुंभारवाड्यात मातीचे काम करणे नसला तरी ते सध्या मंदिराच्या शेजारीच हार-फूल विक्रीचा व्यवसाय करतात.
 मंदिराचा मालकी हक्क हा गुरुनाथ पानेकर यांच्याकडेच आहे. लहान मुलांना कांजण्या, गोवर आला तर अनेक भक्त देवीची ९ ते ११ दिवस उपासना करतात. त्यांच्या मुलांचा कांजण्या, गोवर बरा होतो, अशी भाविकांची धारणा आहे.
    कल्याणमधील शीतला देवी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याने अनेक चाकरमानी कामावर जाण्यापूर्वी देवीचे 
दर्शन घेऊन मुंबईची वाट धरतात. जागृत देवस्थान असल्याने बहुतांश भाविक देवीची खणा नारळाने ओटी भरतात.  

Web Title: Sheetla Devi in Kalyan has a tradition of almost 150 years; The worship has been done for three generations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.