गणेशोत्सव मंडळे काय गुन्हेगार आहेत का?; नोटीस मागे घेतली नाही तर...
By मुरलीधर भवार | Published: August 27, 2022 04:54 PM2022-08-27T16:54:05+5:302022-08-27T16:54:42+5:30
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गणेशोत्सवावर कोणतीही बंधने नसतील. हा जण मोठय़ा उत्साहात साजरा केली जाईल. तर दुसरीकडे पोलिसांकडून नोटिस दिली जाते. हा एक प्रकारे विरोधाभास आहे.
मुरलीधर भवार
कल्याण-कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिली असली तरी दुसरीकडे पोलिसांनी सर्व मंडळांना 149 कलमान्वये नोटिसा बजावल्या आहेत. सामाजिक बांधिकली जपत गणेशोत्सव साजरा करणा:यांना मंडळांना पोलिसांनी नोटिसा बजावल्याने मंडळे काय गुन्हेगार आहेत का ? असा संतप्त सवाल कल्याणच्या विजय तरुण मंडळाने उपस्थित केला आहे. पोलिसांनी नोटिसा मागे घेतल्या नाहीत तर यंदा विजय तरुण मंडळ गणपतीच बसविणार नाही असा पावित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.
मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे ही सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा करीत असतात. या मंडळाच्या माध्यमातून गरजूंना हात दिला जातो. समाजिक संदेशाचे देखावे उभारून समाजात विविद प्रश्नावर समाज प्रबोधन करण्यासाठी जनजागृती केली जाते. त्यामंडळांना 149 ची नोटीस पोलिसांकडून बजाविली जाते. ही नोटिस एखाद्याकडून गुन्हा घडला आहे किंवा घडण्याची शक्यता आहे त्याला बजाविली जाते. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गणेशोत्सवावर कोणतीही बंधने नसतील. हा जण मोठय़ा उत्साहात साजरा केली जाईल. तर दुसरीकडे पोलिसांकडून नोटिस दिली जाते. हा एक प्रकारे विरोधाभास आहे. विजय तरुण मंडळाने पूरग्रस्त, गरजू विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत करुन समाजिक बांधीलगी जपली आहे. याची दखळ पोलिसांनी न घेतली पाहिजे अशी आपेक्षा साळवी यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या नोटिसला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे साळवी यांनी सांगितले.
यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, एकाच मंडळास ही नोटिस दिली नसून सगळ्य़ा मंडळांना ही नोटिस दिली आहे. उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी. अक्षेपार्ह देखावा नसावा यासाठी ही नोटिस आहे.
नोटिसमधील देखाव्याचा मुद्दा पाहता. विजय तरुण मंडळ हे 59 वर्षापासून गणपती उत्सव साजरा करीत आहे. मंडळाने यापूर्वी जे काही देखावे उभारले. त्यामध्ये 373 चे कलम, इशरत जहा हिला वसंत डावखरे यांनी केलेली आर्थिक मदत, अतिरेकी हल्ला हे सगळे देखावे वादग्रस्त ठरले होते. पोलिसांनी त्याला अक्षेप घेतले होते. यापैकी काही प्रकरणात मंडळाने न्यायालयातही धाव घेतली होती. यंदा मंडळाचा देखावा पक्ष निष्ठा हा विषयावर आधारीत आहे. साळवी या मंडळाचे ट्रस्टी आणि शिवसेना महानगर प्रमुख आहेत. सध्या शिंदे सरकार राज्यात आहे. शिंदे यांनी शिवसेनेला सोडून भाजपची साथ देत सरकार स्थापन केले. त्यामुळे मंडळाचा पक्ष निष्ठेच्या विषयावरील देखावा वादग्रस्त होऊ शकतो.