शितल म्हात्रे प्रकरण; ठाकरे गटाचे कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
By मुरलीधर भवार | Published: March 13, 2023 05:09 PM2023-03-13T17:09:08+5:302023-03-13T17:11:13+5:30
शीतल म्हात्रे प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना धमकाविल्याचा आरोप
कल्याण-शीतल म्हात्रे व्हीडीओ प्रकरणात दहिसर पोलिसांनीकल्याणमधील तरुण विनायक डायरे याला ताब्यात घेतले. त्यानंतर काल सायंकाळी डायरे कुटुंबियांना धमकाविल्याचा आरोप डायरे कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोहचले. पोलिसांना नाव सांगून देखील ते अज्ञाताच्या विरोधात तक्रार नोंदवित असल्याने संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आज पहाटेच्या सुमारास ठिय्या आंदोलन केले.
शीतल म्हात्रे व्हीडीओप्रकरणी दहिसल पोलिसांनी कल्याणच्या तिसगाव येथे राहणाऱ्या विनायक डायरेला चौकशीकरीता काल ताब्यात घेतले. डायरे हा ठाकरे गटाच्या मिडिया सेलचे काम पाहतो. त्याला चौकशीकरीता ताब्यात घेतल्यावर त्याच्या घरी काही जण पोहचले. त्यांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. धमकी देणारे तरुण हे शिंदे गटाचे असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. डायरे कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी धमकाविणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्यांच्या विरोधात तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून नावानिशी तक्रार घेतली जात नाही. तसेच अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल करुन घेतली जात आहे असे डायरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे कल्याण पूर्व भागाचे शहर प्रमुख शरद पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रार नावानिशी दाखल करुन घेण्याची मागणी केली. या मागणीवर ठाकरे गट ठाम होता. मात्र पोलिस त्याला दाद देत नसल्याने ठाकरे गटाने मध्यरात्रीच कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी केली. याबाबत कोळसेवाडी पोलिसांकडे विचारणा केली असता या प्रकरणी अधिक काही माहिती देणे आणि बोलणे पोलिसांनी टाळले आहे.