राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी काढला कोंबडी मोर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 03:14 PM2021-08-24T15:14:00+5:302021-08-24T15:15:02+5:30
Kalyan : शिवसैनिकांनी थेट तहसीलदार दीपक आकडे यांच्या दालनात जाऊन त्यांना राणे प्रकरणात सरकारला आमच्या भावना कळवा. या प्रकरणी पोलिसांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
कल्याण: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज कल्याण शिवसैनिकांनी कोंबडी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. राणे यांच्या पोस्टरला चपला मारुन त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुतळा जाळण्यापूर्वीच हिसकावून घेतला.
शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवेसनेचे अरविंद मोरे, रविंद्र कपोते, महिला आघाडीच्या विजया पोटे यांच्यास युवा सेनेचे पदाधिकारी अभिषेक मोरे, योगेश निमसे, सुचेत डांबरे, सूरज खानविलकर, भूषण तरडे आदीनी राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
यावेळी राणे यांच्या फलकाला चपला मारण्यात आल्या. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी शिवसैनिकांच्या हातातील पुतळा हिसकावून त्यांना पुतळा जाळण्यापासून मज्जाव केला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या विरोधात हातात कोंबडय़ा घेऊन तहसील कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.
पोलिसांनी त्यांना तहसील कार्यालयावर अडविण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी थेट तहसीलदार दीपक आकडे यांच्या दालनात जाऊन त्यांना राणे प्रकरणात सरकारला आमच्या भावना कळवा. या प्रकरणी पोलिसांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
यासंदर्भात आमदार भोईर यांनी सांगितले की, राणे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी यापूर्वीही मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेताल आणि चुकीची वक्तवे केली आहे. त्यांनी त्यांच्या जीभेला आवर घालावा. शिवसैनिकांचा संयम पाहू नका. शिवसैनिकांचा संयम सुटला तर तो आवरता येणार नाही. राणे यांनी दादागिरीची भाषा करु नये. शिवसेनेत ही दादा आहेत.