पाय गमावलेल्या ‘त्या’ तरुणाच्या उपचारासाठी शिवसेना सरसावली; १ लाखाची मदत
By प्रशांत माने | Published: May 26, 2024 05:34 PM2024-05-26T17:34:58+5:302024-05-26T17:35:54+5:30
संपूर्ण उपचार होणार निशुल्क, कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात राहणारे जगन (वय ३१) हे रात्री ९ वाजता दादर ते कल्याण असा लोकलने प्रवास करत होते.
कल्याण: लोकलमधून प्रवास करणा-या जगन जंगले या प्रवाशाच्या हातावर गर्दुल्याने फटका मारल्याने ते लोकलमधून खाली पडले. यात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. ठाण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या जगन यांच्या मदतीसाठी कल्याण पूर्वेचे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड धावले आहेत. त्यांनी एक लाखांची आर्थिक मदत सुपूर्द केली. त्यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने देखील मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले आहे.
कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात राहणारे जगन (वय ३१) हे रात्री ९ वाजता दादर ते कल्याण असा लोकलने प्रवास करत होते. ठाणे ते कळव्याच्या दरम्यान ते दरवाजात उभे असताना काही टवाळखोरांनी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने दांडक्याने जोरात आघात केला. दांडका हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन जगन लोकलच्या खाली पडले. यात त्यांचे दोन्ही पाय ट्रेनखाली सापडले. सध्या त्यांच्यावर ठाणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
कल्याण पुर्वेत भाडयाच्या घरात राहणा-या जगन यांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. दादर पश्चिम येथील एका बुक शॉप मध्ये महिना १५ हजार पगारावर खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. परंतू दोन्ही पाय गेल्याने त्यांना अपंगत्व आले आहे. जगन यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता हॉस्पिटलचा खर्च हा आवाक्याबाहेरचा आहे. दरम्यान ही माहिती मिळताच कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख गायकवाड यांनी रविवारी हॉस्पिटलमध्ये धाव घेत जगन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कल्याण शहर कक्षप्रमुख चंद्रसेन सोनवळे, युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड, अक्षय गाडे उपस्थित होते. गायकवाड यांनी जगन यांच्या पुढील उपचारासाठी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे सहकार्य केले जाईल असे गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाळ सिंह यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करणार असून याअगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचे जाहीर केले.