डोंबिवलीत शिवसेनेने पाडले मनसेला खिंडार, पालकमंत्री, खासदारांची राजकीय खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:26 AM2021-02-02T01:26:49+5:302021-02-02T01:27:13+5:30
Dombivali News : कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत शिवसेनेने मनसेला खिंडार पाडले आहे.
कल्याण - कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत शिवसेनेने मनसेला खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांनाच आपलेसे करून एक महत्त्वाची राजकीय खेळी खेळली आहे. या घटनेमुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.
कदम यांच्यासह मनसे विद्यार्थी संघटनेचे सागर जेधे, कल्याण तालुकाध्यक्ष अजरून पाटील, दीपक भोसले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कदम हे पूर्वी शिवसेनेत होते. मनसेची स्थापना झाल्यापासून ते संस्थापक सदस्य होते. २००९ मध्ये त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. विविध कल्पक आंदोलने करून महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीला कायम जाब विचारून धारेवर धरणारे, अशी कदम यांची प्रतिमा आहे. मनसेचा सच्चा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षात घेऊन मनसेचाच मोहरा हिरावून घेतला आहे.
कदम यांनी म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारे संयमित नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काम पाहिले. खासदार म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे.
या प्रवेशासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले की, अचानक आज शिवसेनेत त्यांनी केलेला प्रवेश हा अनाकलनीय आहे.