कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गट दहिहंडी साजरी करणार
By मुरलीधर भवार | Published: September 6, 2023 03:49 PM2023-09-06T15:49:34+5:302023-09-06T15:50:45+5:30
उच्च न्यायालयाचे आदेश.
मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी करण्यास पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याला आपेक्ष घेतला होता. मात्र न्यायालयाने आज या याचिकेवर सुनावणी देताना ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी न करता शिवसेना शहर शाखेच्या बाजूला दहिहंडी साजरी करावी असे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गट दहिहंडी साजरी करणार आहे. दहिहंडी उत्सव साजरा करण्यावरुन शिंदे गटाने ठाकरे गटावर कूरघोडी केली आहे.
हा निकाल लागताच शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक माेहन उगले, जयवंत भोईर, अरविंद मोरे आदी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास हार घालून घोषणाबाजी केली. फटाके फोडून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी उत्सावाची जय्यत तयारी शिंदे गटाकडून सुरु आहे.
ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन छत्रपती शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना दहिहंडी साजरी करीत आहे. शिवसेनेत फूट पडून शिंदे आणि ठाकरे गट झाल्यावरही मागच्या वर्षी ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी होती. यावर्षी दहिहंडी साजरी करण्याची परवानगी पोलिसांनी शिंदे गटाला दिली आहे. पोलिस आणि महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. या याचिकेवर दोन्ही पक्षाच्या बाजू काल न्यायालयाने ऐकून घेतल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी केल्यास वाहतूकीस अडथळा होतो. वाहतूक कोंडी होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे मुद्दे उपस्थित केले गेले.
मात्र ठाकरे गटाच्या वकीलांनी जर ठाकरे गटाला परवानगी दिल्याने हे प्रश्न उद्भवू शकतात. तर शिंदे गटाला परवानगी दिल्याने सुद्धा हे प्रश्न उद्भव शकतात. पोलिसांनी ठाकरे गटाला छत्रपती शिवाजी महाराजा चौका ऐवजी अन्य ठिकाणी जागा सूचवा असे सांगितले हाेते. शिंदे गटाच्या वकीलाने सुनावणी दरम्यान ठाकरे गटाने शंकरराव चाैकात दहिहंडी साजरी करावी असे सूचित केले होते. ठाकरे गटाच्या वकीलांकडून ती जागा योग्य नसून त्याठिकाणी महापलिकेचे मुख्यालय आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांनी सूचविलेल्या पर्यायानुसार दुसऱ्या ठिकाणी ठाकरे गटाने दहिहंडी साजरी करावी असे सूचित केले. शिवसेना शहर शाखेच्या बाजूला दहिहंडी साजरी करावी असे आदेश दिले आहे.
यासंदर्भात ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की, न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार होता. मात्र तितका वेळ नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पदाधिकाऱ््यांची बैठक घेऊन शिवसेना शहर शाखेच्या बाजूला दहिहंडी साजरी करायची की नाही हे ठरविले जाणार आहे.