एकनाथ शिंदे तारणहार, श्रीकांत शिंदे हे विकास पुरुष; शिवसेनेचं भाजपाला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:15 AM2022-02-25T11:15:16+5:302022-02-25T11:15:55+5:30
टीकाकार बिनकामाचे. शिवसेनेचा टोला
कल्याण : ‘डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाखविण्यासारखे काही एक काम उरले नाही. त्यांचे कर्म लपविण्यासाठी ते दुसऱ्यांवर टीका करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीचे तारणहार पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पालकमंत्री आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विकास पुरुष आहेत. चव्हाण यांनी काय केले आणि पालकमंत्र्यांनी काय केले,’ असा पलटवार शिवसेना युवा सेना जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.
चव्हाण यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी डोंबिवली शहर शाखेत शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक तात्या माने आदी उपस्थित होते.
‘ज्या रस्त्यांची कामे रद्द केल्याचे ते सांगत आहेत. ती कामे मंजूर झाली होती, हे चव्हाण यांनी लाइव्ह कार्यक्रमात येऊन एकाच व्यासपीठावर सांगावे,’ असे खुले आव्हान दीपेश म्हात्रे यांनी दिले.
‘कोरोना काळात तर त्यांनी केसही कापले नाहीत’
- कोरोनाकाळात चव्हाण हे कोरोना होईल या भीतीपोटी घराबाहेर केस कापण्यासाठी देखील पडले नाहीत. त्यांनी केस वाढविले होते. कोरोनाकाळात ते कोकणातील गावी जाऊन बसले होते.
- मात्र, पालकमंत्री आणि खासदार हे रस्त्यावर उतरले होते. पालकमंत्र्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. पालकमंत्री आणि खासदारांच्या विकासकामांमुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यातून ते अशा प्रकारची टीका करीत आहेत. विरोधकांकडून टीका झाली म्हणजे सत्ताधारी योग्य प्रकारे काम करीत असल्याचे हे द्योतक आहे, असे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले.