राणेंच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी; उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक पोलीस यांच्यात झटापट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 01:31 PM2021-08-24T13:31:38+5:302021-08-24T13:32:13+5:30
सदानंद थरवळ यांनी जमावाला आवाहन करताना राणेंच्या वक्तव्याचे अजिबात समर्थन नाही असे स्पष्ट केले.
डोंबिवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यभरात निषेधाचे पडसाद उमटले. डोंबिवली शहर शिवसेना शाखेच्यावतीने कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, युवासेना सागर जेधे, राहुल म्हात्रे आदींसह शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौकात कोंबड्या उडवून नारायण राणेंचा निषेध केला.
यावेळी कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. जेधे यांनी राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पण तो पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर आणखी एक पुतळा शिवसैनिकांनी आणला खरा पण तो फाडण्यात आला. त्यावर राणेंची छबी होती. त्या छबीला फाडण्यात आले.
सदानंद थरवळ यांनी जमावाला आवाहन करताना राणेंच्या वक्तव्याचे अजिबात समर्थन नाही असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान खपवून घेतले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर असे व्यक्तव्य करू नये तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. राणे यांनी डोबिंवलीत पाऊल ठेवू नये, ठेवल्यास त्यांच्या स्वागताची तयारी केली जाईल असे खुले आव्हान शिवसेना महिला शहर आघाडी, रणरागिणी कविता गावंड, वैशाली दरेकर, मंगला सुळे आदींनी केले. मोरे, जेधे आदींना रामनगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.