"काम करूनच टीकेला उत्तर द्यावे लागते", श्रीकांत शिंदेंचा मनसेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 01:39 PM2020-11-23T13:39:42+5:302020-11-23T13:48:15+5:30
Shivsena Shrikant Shinde And MNS : रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन हे काम करायचे होते. त्याचे गर्डर ४५ दिवसांत हैदराबाद येथे तयार केले गेले.
कल्याण - कल्याण पत्रीपुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना पत्रीपुलाच्या अॅप्रोच रोडचे काम केले गेले नसल्याची टीका मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केली होती. त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, काम करूनच टीकेला उत्तर द्यावे लागते. विरोधकांनी कन्स्ट्रक्टिव्ह माईडने काम करावे, असा टोला मनसेला लगावला आहे.
डॉ. शिंदे म्हणाले की, पत्रीपुलाच्या कामात विलंब झाला आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन हे काम करायचे होते. त्याचे गर्डर ४५ दिवसांत हैदराबाद येथे तयार केले गेले. ते आणण्याआधीच लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर पावसाने जोर धरला. तेलंगणा सरकारकडून परवानगी घेऊन गर्डर आणले गेले. पत्रीपुलाचे काम होत असताना त्याचे स्वागत करण्याऐवजी टिका करण्यात काय मतलब आहे. नागरिकांमध्ये नाराजी होती. विरोधकांनी त्यावर गाणी तयार केली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जबाबदारीपूर्वक काम करावे लागते. काहीही करून चालत नाही. त्यावर मात करत हे काम पूर्ण केले जात आहे. त्याचे कौतुक विरोधकांनी करणे अपेक्षित होते. त्यांच्याकडून केली जात आहे. त्यांचे काम त्यांना करू द्या, असे शिंदे यांनी सुनावले आहे.
...तर वेळेत काम झाले असते
पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर वेळेत पुलाचे काम झाले असते असा टोला मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे. पत्रीपुलाचे काम रविवारी पूर्ण झाले नाही. आता या कामासाठी पुन्हा मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. रेल्वेच्या परिसरात पूल तयार करायचे असतीलतर मेगाब्लॉक घ्यावे लागतात ते मुश्कीलीने मिळतात. कारण त्यामुळे बऱ्याचशा रेल्वेच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात. रेल्वे शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा मेगाब्लॉक पत्रीपुलाच्या कामासाठी दिला होता. शनिवारी पुलाच्या खाली जाऊन, इंजिनिअर घालतात तशा कॅप घालून बाईट दिल्या नसत्या तर वेळ वाया गेला नसता यात आजचे काम पूर्ण झाले असते, अशी टीका पाटील यांनी केली.