शिवशेतपाडा प्रकाशला; पंधरा घरांमध्ये दीपावली साजरी
By अनिकेत घमंडी | Published: November 28, 2023 04:47 PM2023-11-28T16:47:23+5:302023-11-28T16:47:52+5:30
येथील आदिवासी बांधवांनी आनंदाने दिवाळीनंतरही विजेच्या प्रकाशात पुन्हा दीपावली साजरी केली.
महावितरणच्या शहापूर उपविभागीय कार्यालयांतर्गत शिवशेत या आदिवासी पाड्यातील पंधरा घरांमध्ये सोमवारी (२७ नोव्हेंबर) रात्री प्रकाश पोहचला. महावितरणने पायाभूत सुविधा उभारत विखुरलेल्या व दुर्गम भागातील १५ घरांना नवीन वीजजोडणी दिली आणि येथील आदिवासी बांधवांनी आनंदाने दिवाळीनंतरही विजेच्या प्रकाशात पुन्हा दीपावली साजरी केली.
दुर्गम भागात विखुरलेली घरे असल्याने वीजपुरवठा करण्याचे काम आव्हानात्मक होते. गोपाळपाडा गावाला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रापासून लघुदाब वाहिनीचे चार खांब उभारून ३ घरांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. तर बेहरेपाडा येथील रोहित्रापासून १६ लघुदाब वाहिनीचे खांब उभारून १२ घरांची जोडणी कार्यान्वित करण्यात आली.
शिवशेत पाड्यातील १५ घरांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी एकूण २० खांब उभारून एक किलोमीटर लघुदाब वाहिनी टाकण्यात आली. वीज पुरवठ्याच्या मागणीनंतर युद्धस्तरावर काम पूर्ण करून महावितरणने वीजजोडणी दिल्याचा आनंद शिवशेत पाड्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. दिवाळीनंतरच्या आठवडाभरात सोमवारी रात्री प्रकाश पोहचल्यानंतर शिवशेत पाडा येथील आदिवासी बांधवांनी अक्षरश: पुन्हा एकदा दीपावली साजरी करत महावितरणला धन्यवाद दिले.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे कार्यकारी अभियंता विनय काळे, शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश मालखेडे, खर्डी शाखेचे शाखा अभियंता सुरेश राठोड आणि कंत्राटदार प्रकाश भोईर यांच्या टिमने शिवशेतपाडा प्रकाशमान करण्याची कामगिरी यशस्वी केली.