धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:15 PM2022-03-16T19:15:37+5:302022-03-16T19:16:58+5:30
डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली आहे.
डोंबिवली : सध्या ऑनलाईन बँकींग किंवा ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढले आहेत. आत्तापर्यंत आपण सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे ऐकले होते. त्याबद्दल अनेक गुन्हे आणि तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, आता चक्क बँकेचा सर्व्हर हॅक करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर गुन्हा घडला आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली आहे.
डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाणे येथे याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात हॅकर्सने डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर असलेल्या नवी मुंबई महापे येथील सर्व्हर कक्षात ऑनलाइन पद्धतीने संपर्क केला. त्यानंतर, बँकेचे खाते हॅक करून किंवा सर्व्हरमध्ये फेरफार करून बँकेची 1 कोटी 51 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच संगणक प्रमुख राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
दरम्यान, सायबर क्राईमशी निगडीत हा गुन्हा असल्याने मानपाडा पोलिसांनी ही तक्रार अधिक तपासासाठी सायबर पोलिसांकडे वर्ग केली आहे. मात्र, अशाप्रकारे बँकेचा सर्व्हर हॅक करुन पैसे हडप केल्याने बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.