धक्कादायक! कल्याण डोंबिवलीत जैविक कचरा उघड्यावर ! कचरा उचलणा-या कर्मचा-यांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 07:11 PM2021-03-18T19:11:18+5:302021-03-18T19:14:02+5:30
Kalyan-Dombivali News : शहरातील काही खाजगी संस्था या उघड्यावरच जैविक कचरा टाकत असल्याचे दिसून येतंय. कल्याण पूर्व परिसरात अनेक ठिकाणी औषधं , इंजेक्शन्स व इतर जैविक कचरा हा उघड्यावर टाकला जातोय.
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून शून्य कचरा मोहीम राबविण्यात येतेय. यासाठी नागरिकांना ओला आणि सुका कच-याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केलं गेलय. मात्र असे असले तरी शहरातील काही खाजगी संस्था या उघड्यावरच जैविक कचरा टाकत असल्याचे दिसून येतंय. कल्याण पूर्व परिसरात अनेक ठिकाणी औषधं , इंजेक्शन्स व इतर जैविक कचरा हा उघड्यावर टाकला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे हा कचरा उचलणा-या कर्मचा-यांना सुरक्षिततेची कोणतेही साधनं पुरविण्यात येत नसल्याचे या दृश्यात दिसतय.
कल्याण पूर्वेत बहुतांश परिसरात कचरा उचलण्याचे काम हे खाजगी कंत्राटदाराला देण्यात आलंय. आधिच हा कचरा वेळेत उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यात जैविक कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या कंत्रातदाराच्या गलथान कारभाराचीही भर पडलीये. विशेष म्हणजे जैविक कचरा जमा करण्यासाठी केडीएमसीने विशेष कंत्राटदाराची नेमणूक केलीये. मग असे असताना जैविक कचरा उघड्यावर कसा टाकला जातो? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणे पालिका प्रशासन जैविक कचरा उघड्यावर टाकणा-या खाजगी संस्थांना व पर्यायाने कंत्रादारांना कशाप्रकारे शिस्त लावतात? ते पाहावे लागेल.