मलंगगडावर शिंदे-ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन; भाविकांची लोटली गर्दी, महाआरतीची परंपरा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:33 PM2023-02-06T14:33:40+5:302023-02-06T14:34:15+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले.

Show of power by Shinde-Thackeray group at Malanggarh; Crowd of devotees, tradition of Mahaarti continues | मलंगगडावर शिंदे-ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन; भाविकांची लोटली गर्दी, महाआरतीची परंपरा कायम

मलंगगडावर शिंदे-ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन; भाविकांची लोटली गर्दी, महाआरतीची परंपरा कायम

googlenewsNext

कल्याण : माघ पौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी मलंगगडावर हिंदू भाविक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती. दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेत पूजा आणि महाआरती केली. शिवसेना दुभंगल्यावर साजरा होणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने ठाकरे-शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन मलंगगडावर पाहायला मिळाले.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. माघ पौर्णिमेची महाआरतीची परंपरा अविरत सुरू असून कोरोनानंतर झालेल्या या उत्सवात भाविकांचा मोठा उत्साह होता. श्री मलंगगडावर जाऊन शिंदे यांनी श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते. 

आनंद दिघे यांनी मलंग उत्सवाला सुरूवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही सुरू ठेवू, मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले. गेल्या सहा महिन्यांत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात कोविडमुळे निर्बंध घातले गेले होते. आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव मोठ्या जोमात साजरे करण्यात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार कार्यरत आहे. देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. 

उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत, असे म्हणाले. फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावाही शिंदेंनी केला. 

दानवे, विचारे, दिघेंची उपस्थिती
खासदार राजन विचारे,  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर, रूपेश म्हात्रे, विजय साळवी यांच्यासह मोठ्या संख्येने ठाकरे गटातील जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मलंगगडावर उपस्थिती लावली होती. 

फ्युनिक्युलर ट्रॉलीकरिता पुढाकार घ्या
गेल्या १५ वर्षापासून फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम रखडले आहे. अनेक वर्षे शिंदे पालकमंत्री असूनही ते काम अद्याप मार्गी लागलेले नाही. मुख्यमंत्री म्हणून आता संधी मिळाली आहे. लवकरात लवकर हे काम त्यांनी मार्गी लावावे. केवळ शिवसैनिकांना त्रास देण्याचे काम करू नका. केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. गेली ३९ वर्षे मलंगमुक्तीसाठी हिंदूंची वहिवाट चालू आहे. त्यासाठीही शिंदेंनी पुढाकार घ्यावा, असे खासदार विचारे यांनी सांगितले. 
 

Web Title: Show of power by Shinde-Thackeray group at Malanggarh; Crowd of devotees, tradition of Mahaarti continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.