प्रामाणिकपणाचे घडविले दर्शन, रिक्षाचालकाने महिलेची पर्स केली परत
By प्रशांत माने | Published: January 18, 2024 06:41 PM2024-01-18T18:41:25+5:302024-01-18T18:42:04+5:30
प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेली आणि किमती मुद्देमाल असलेली पर्स संबंधित प्रवासी महिलेला परत केली.
डोंबिवली: एकीकडे प्रवासी भाडे नाकारणा-या तसेच जादा भाडे घेऊन मुजोरीचे दर्शन घडविणा-या रिक्षाचालकांच्या नावाने प्रवासी खडे फोडत असताना दुसरीकडे एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेली आणि किमती मुद्देमाल असलेली पर्स संबंधित प्रवासी महिलेला परत केली. सुनील मारूती गंदाकटे ( बुवा) असे प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणा-या रिक्षाचालकाचे नाव आहे.
बुधवारी संध्याकाळी डोंबिवली पश्चिम येथे राहणा-या सुप्रिया खोरे यांनी पुर्वेकडील एमआयडीसी निवासी भागातून रिक्षा पकडली आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात उतरून त्यांनी घर गाठले. पण रिक्षातून उतरताना त्या त्यांच्याजवळील पर्स गडबडीत रिक्षातच विसरल्या. रिक्षाचालक बुवा यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मनसेचे शहर संघटक हरीश पाटील यांना संपर्क केला. पर्सची तपासणी केली असता त्यात एक तोळयाचा सोन्याचा कानातील दागिना तसेच ८ हजार रूपयांची रोकड असा मुद्देमाल होता. तसेच आधारकार्ड देखील होते. लागलीच पाटील यांनी आधारकार्ड वर असलेल्या घरच्या पत्त्यावरून डोंबिवली पश्चिममध्ये राहणा-या खोरे यांच्याशी संपर्क केला व स्वत: पाटील आणि रिक्षाचालक बुवा यांनी खोरे यांचे घरी जाऊन रोख रक्कम आणि दागिना असलेली संबंधित पर्स त्यांना परत केली. रिक्षाचालक बुवा यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मनसेच्या वतीने बुवा यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती शहर संघटक पाटील यांनी दिली