एक सही कल्याण पुर्वेच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे स्वाक्षरी मोहीम
By प्रशांत माने | Published: September 3, 2023 02:37 PM2023-09-03T14:37:55+5:302023-09-03T14:38:42+5:30
'एक सही कल्याण पुर्वेच्या सुरक्षिततेसाठी' ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: पुर्व परिसरात गेल्या महिनाभराच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. तरुणांमधील अंमली पदार्थांचे व्यसन, टोळीयुद्ध, मुलींची छेडछाड, विनयभंग, हत्या तसेच सततच्या चोरीच्या घटना अशा गंभीर गुन्ह्यांनी कल्याण पुर्वेतील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी रविवारी 'एक सही कल्याण पुर्वेच्या सुरक्षिततेसाठी' ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत कल्याण पुर्व भागातील शिवसेनेच्या सर्व शाखांमध्ये ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. पुर्वेतील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या प्रमाणात सध्या अस्तित्वात असलेले कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस बळ अपुरे पडत आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेसाठी आणखीन एक स्वतंत्र पोलिस ठाणे असलेच पाहिजे अशी मागणी या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. आपली सुरक्षितता, एकजूट दाखवण्यासाठी कल्याण पुर्वेतील सुजाण नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेस भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्याकडून केले गेले होते.