‘होऊ दया चर्चा’ रद्द केल्याच्या निषेधार्थ ‘ठाकरे’ गटाचा मूक मार्च
By प्रशांत माने | Published: October 8, 2023 08:20 PM2023-10-08T20:20:35+5:302023-10-08T20:27:18+5:30
उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होऊ दया चर्चा’ हा कार्यक्रम ठिकठिकाणी चालू होता.
डोंबिवली : उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होऊ दया चर्चा’ हा कार्यक्रम ठिकठिकाणी चालू होता. परंतू उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पुढील होणारे डोंबिवलीतील कार्यक्रम पोलिसांनी नोटीस बजावत रद्द केले. याच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज संध्याकाळी मूक मार्च काढण्यात आला होता. मानपाडा रोडवरील पक्षाच्या मध्यवर्ती शहर शाखेतून निघालेला मूक मार्च हा इंदिरा चौकापर्यंत काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
दंडाला आणि तोंडाला काळया फिती, तसेच हातात मेणबत्ती आणि पेटत्या मशाली घेऊन ठाकरे गटाचे सदानंद थरवळ, तात्या माने, विवेक खामकर, वैशाली दरेकर राणे, मंगला सुळे, अभिजीत थरवळ, संदीप नाईक, राहुल चौधरी यांसह अन्य पदाधिकारी आणि मोठया संख्येने कार्यकर्ते मूक मोर्चात सहभागी झाले होते. लोकशाही नको, स्वातंत्र्य नको, चर्चा नको, फक्त आणि फक्त... पण जनता सुज्ञ आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्य आमच्या हक्काचे अशा लिखाणाचे फलक झळकविण्यात आले होते.