रेरा आणि केडीएमसी फसवणूक प्रकरणी एसआयटीने केली पाच बिल्डरांना अटक
By मुरलीधर भवार | Published: November 23, 2022 07:16 PM2022-11-23T19:16:25+5:302022-11-23T19:16:46+5:30
कल्याण डाेंबिवली महापालिका आणि रेरा प्राधिकरणाच्या फसवणूक प्रकरणी एसआयटीने पाच बिल्डरांना अटक केली आहे.
कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका आणि रेरा प्राधिकरणाच्या फसवणूक प्रकरणी एसआयटीने पाच बिल्डरांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बिल्डरांची नावे मुकुंद मिलिंद दातार, सुनिल बाळाराम मढवी, आशू लक्ष्मण मुंगेश, रजत राजन आणि राजेश रघुनाथ पाटील अशी आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागाकडून वैधरित्या बांधकाम परवानगी मिळालेली नसताना खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन ६५ प्रकरणात बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासविले. त्याच खोटय़ा परवानगी आधारे रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. हे प्रकरण माहिती अधिकारात वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उघड केले. या प्रकरणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. त्याचबराेबर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात महापालिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. त्याचबरोबर ईडीकडूनही चौकशी सुरु आहे. या प्रकरणात खाेटी कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हणकर, राहूल नवसागरे, जयदीप त्रिभूवन आणि कैलास गावडे या पाच जणांना ५ नाेव्हेंबर राेजी अटक केली हाेती. त्यांना दाेन दिवसांच्या पाेलिस काेठडी पश्चात पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन काेठडीत केली हाेती. या पाच जणांकडून आठ संगणक जप्त केले. पाच जणांशी संबंधित १६ बॅंक खाती गाेठविण्यात आली. यापूर्वी बिल्डरांची ४० बॅंक खाती गाेठविण्यात आली हाेती.
दरम्यान या प्रकरणाचे तक्रारदार पाटील यांच्या जिवितास धोका असल्याने त्यांनी पोलिसांकडे त्यांना पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. त्यांना अद्याप पोलिस संरक्षण मिळालेले नाही. तक्रारदार पाटील यांनी कल्याण न्यायालयात त्यांचा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या जिवितास धोका असल्याने ते फायनल जबाबसाठी राहतील की नाही याबाबत त्यांना साशंकता असल्याने त्यांनी न्यायालयापुढे जबाब नोंदविला आहे. त्यानंतर आज एसआयटीने पाच जणांना अटक केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"