वनहक्क दावे मंजूर करण्यासाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 03:07 PM2021-12-13T15:07:50+5:302021-12-13T15:08:38+5:30
श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने
कल्याण- प्रलंबित असलेले वनहक्क दावे मंजूर करण्याच्या मागणीसाठी आज वनहक्क दिना निमित्त कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडी याभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी श्रमिक मुक्त संघटनेच्या वतीने कल्याणच्या प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जोर्पयत हे दावे मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिले जात नाही. तोर्पयत हा ठिय्या हटविला जाणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयास देण्यात आला आहे.
श्रमिक मुक्ती संघटनेच्या प्रमुख इंदूताई तुळपुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनात बारकू चवर, गोपाळ हेमाडे, विठ्ठल मुकणो, मिठू मुकणो आणि कमळू पादिर यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. कल्याण मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडी परिसरातील 256 दावे प्रलंबीत आहेत. तसेच 456 जणांनी अपील केले आहे. त्यांच्या अपीलावरही अद्याप निर्णय झालेला नाही. वनहक्कांच्या नोंदी केल्या जात नसल्याने वहक्कासंदर्भातील विकास योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. वनहक्क कायदा हा 2006 साली मंजूर करण्यात आला. हा कायदा मंजूर होऊन 15 वर्षे उलटून गेली तरी अद्याप वनहक्कांच्या नोंदी केल्या जात नाही. दावे प्रलंबित ठेवले जातात. तसेच अपीलात गेलेल्यांच्या दाव्यावरही निर्णय घेतला जात नाही. यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे तुळपूळे यांनी सांगितले. प्रांत कार्यालयाने लेखी माहिती दिली नाही. तर पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा इशारा तूळपुळे यांनी दिला आहे.
कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील हे ग्रामीण भागातील निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने ते सायंकाळी कार्यालयात आल्यावर या सगळ्य़ाचा आढावा घेणार आहेत. मात्र दरम्यान नायब तहसीलदार रिताली परदेशी यांनी सांगितले की, आज वनहक्क दिना निमित्त या आदिवासींचे आंदोलन आहे. वनहक्कांचे दावे मंजूर करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. दोन तालुक्यातील किती प्रकरणो मंजूर झाली याची माहिती तयार आहे. प्रांत अधिकारी यासंदर्भात संबंधित संघटनेला माहिती देणार आहेत.