कल्याण डोंबिवलीतील आत्तापर्यंत १७ हजार ९१२ लाडक्या बहिणींनी भरले अर्ज
By मुरलीधर भवार | Published: July 17, 2024 07:43 PM2024-07-17T19:43:21+5:302024-07-17T19:43:53+5:30
आज पर्यंत ६३०४ ऑनलाईन आणि ११६०८ ऑफलाईन अर्ज महिलांनी भरले आहेत.
कल्याण - "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा या उद्देशाने आज अत्रे रंग मंदिरात महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी एक बैठक घेतली. या बैठकीस राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकउपस्थित होते. याेजनेचा लाभ जास्ती जास्त महिलाना मिळावा या करीता महापालिकेने प्रभाग निहाय ३६६ केंद्रात, २८ नागरी आरोग्य केंद्रात, १० प्रभाग कार्यालयात आणि २७७ अंगणवाडी केंद्रात मदत कक्ष सुरु केले आहेत. आजच्या बैठकीत योजनेची माहिती उपस्थिताना देण्यात आली. योजनेचे ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज कसे भरावेत याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या मुख्य सेविका सुषमा खरात यांनी मार्गदर्शन केले.
आज पर्यंत ६३०४ ऑनलाईन आणि ११६०८ ऑफलाईन अर्ज महिलांनी भरले आहेत. महिला बचत गटांमार्फत भरण्यात येणाऱ्या प्रत्येक ऑनलाइन फॉर्म मागे ५० रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे . महानगरपालिका हद्दीतील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रुपयेदोन लाख पन्नास हजार रुपयांच्या आत असेल अशा कुटुंबातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांनी लाभ घ्यावा. त्यांच्याकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड हवे असे आवाहन महापालिका आयुक्त जाखड यांनी केली आहे.