...म्हणून गांधारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:10 PM2021-07-26T23:10:32+5:302021-07-26T23:11:16+5:30
kalyan : पुलाच्या पिलरचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून रात्रीची वेळ असल्याने उद्या सकाळी तांत्रिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ व्यक्ती येऊन या संपूर्ण पुलाची पाहणी करतील, असे पीडब्ल्यूडी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कल्याण : कल्याणडोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस पडला. यामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे गांधारी पुलाच्या पिलरला नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पीडब्ल्यूडीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून कोणतीही दुर्घटना होऊ नये, याकरिता आज रात्रीपासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आल्याची माहिती दिली. पुलाच्या पिलरचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून रात्रीची वेळ असल्याने उद्या सकाळी तांत्रिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ व्यक्ती येऊन या संपूर्ण पुलाची पाहणी करतील, असे पीडब्ल्यूडी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आज रात्रीपासून गांधारी पुलावरील वाहतूक बंद केल्याने पडघाकडे जाणाऱ्या वाहनांना भिवंडी बायपासमार्गे वळसा घालून जावे लागले. तर गांधारी पुलापलीकडील सोसायटीमध्ये राहणारे काही जण चालत आपल्या घरी गेले. याठिकाणी वाहतूक शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो ते उद्या स्पष्ट होईल.