संविधान यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची : श्यामकांत अत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 02:29 PM2020-11-27T14:29:29+5:302020-11-27T14:29:50+5:30
Constitution Day: आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: भारतीय संविधान हे सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे . परंतु ते यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य श्यामकांत अत्रे यांनी व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठान या संस्थेने पेंढरकर सभागृह, टिळकनगर विद्यामंदिर येथे गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यामुळे देशोदेशींच्या राज्यघटनेतील अनेक चांगल्या बाबींचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेत पाहायला मिळते. भारतीय राज्यघटना केवळ पाश्चात्य विचारांवर आधारित नाही. हजारो वर्षांच्या संतुलित समाज व्यवस्थेची परंपरा तिला लाभली आहे. त्यामुळेच ती बंदिस्त नाही. तिच्यात लवचिकता आहे . ज्यामुळे तिच्यात कालानुरूप, लोकांच्या आशा-अपेक्षांनुसार सुधारणा केली जाऊ शकते असे ते म्हणाले.
नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांबाबत राज्यघटनेने मौलिक भाष्य केलेले आहे परंतु समाज कर्तव्यपारायण नसल्याने समाज अपेक्षित यश प्राप्त करू शकला नाही असे ते म्हणाले. आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. व्यासपीठावर भारतमाता, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, राज्यघटनेची प्रत अशी योजना केली होती ज्यांचे सर्व उपस्थितांनी पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्युदय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विठ्ठल भट असल्याची माहिती संघ स्वयंसेवक चंद्रकांत जोशी यांनी दिली.