पोटच्या मुलाने केली आईची निर्घृण हत्या; शवविच्छेदन अहवालानंतर फुटली वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 09:51 AM2022-09-08T09:51:14+5:302022-09-08T09:51:46+5:30
कोळसेवाडी पोलिसांना पूर्वेतील हनुमाननगर परिसरात एका घरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या घटनेचा तपास सुरू केला.
कल्याण: व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह घरात लटकवून तिने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र, या हत्येचे बिंग शवविच्छेदन अहवालानंतर उघडकीस आले. ही आत्महत्या नसून मुलानेच आईची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी मुलगा रवी पुमणी (वय ३४) याला अटक केली आहे.
कोळसेवाडी पोलिसांना पूर्वेतील हनुमाननगर परिसरात एका घरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या घटनेचा तपास सुरू केला. मृत महिला सरोजा पुमणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी रवी याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तो व्यसनाधीन असल्याचे समजले. तो नशा करण्यासाठी आईकडून वारंवार पैसे मागायचा. त्यासाठी तो आईशी भांडण करायचा. सोमवारी रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी रवीला दुखापत झाली.
रवीने गळा आवळून आईची हत्या केली. ते लपविण्यासाठी रवीने आईचा मृतदेह घरात लटकवून तिने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र, कोळसेवाडी पोलिसांच्या सखोल तपासाअंती ही हत्या असल्याचे उघडकीस आली आहे.
हत्येनंतर बहिणीला फोन
आईची हत्या केली तेव्हा रवीने त्याच्या बहिणीला मध्यरात्रीस फोन केला होता. मात्र, रात्री येणे शक्य नसल्याचे त्याच्या बहिणीने सकाळी येते, असे सांगितले होते. त्याची बहीण व मेहुणे हे सकाळी घरी गेले. तेव्हा रवीने दार उशिरा उघडले होते, ही माहिती देखील पोलिसांनी सांगितली.