मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच?

By अनिकेत घमंडी | Published: June 1, 2024 07:30 PM2024-06-01T19:30:31+5:302024-06-01T19:31:02+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देण्यात येणार होत्या.

Special bus service to TMC ran empty during the megablock period | मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच?

मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच?

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या वतीने तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून अतिरिक्त बसची सुविधा ठाणे ते मुलुंड आणि ठाणे दिवा अशी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ५० अतिरिक्त बस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. मात्र या बस सेवेला प्रवाश्यांचा अल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. या मेगा ब्लॉकची पूर्वकल्पना असल्याने नागरिक घराबाहेरच पडले नसल्याने बसेस काही प्रमाणात रिकाम्या धावल्याचे निदर्शनास आले. सीएसएमटी येथील फलटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलटांच्या कामांसाठी तीन दिवसांचा जेम्बो मेगाबॉल्क घेण्यात आला आहे. परंतु या कालावधी कामावर जाणाऱ्या आणि कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत.यासाठी ठाणे परिवहन सेवा देखील प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली होती . ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देण्यात येणार होत्या.

सध्या परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असून त्या व्यतिरिक्त या बस उपलब्ध करून देण्यात आल्या.या ५० बस मुलुंड ते ठाणे आणि ठाणे ते दिवा या मार्गावर सोडल्या गेल्या.पण या मेगाब्लॉकची पूर्व कल्पना असल्याने अनेक नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले होते. परिणामी शुक्रवार, शनिवारी म्हणावी तितकी गर्दी दिसून आली नाही. प्रवासीच घराबाहेर न पडल्याने ठाणे परिवहन सेवेच्या बसेस या रिकाम्याच दिसून आल्या. याचा परिणाम थेट ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर झाल्याचे दिसून आले आहे. इतर दिवशी ठाणे परिवहन सेवेचे सरासरी उत्पन्न हे २३ ते २४ लाखाच्या आसपास असते. पण शुक्रवारी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करूनही २० लाख ८१ हजार ४३३ रुपये इतकेच उत्पन्न परिवहन सेवेच्या तिजोरीत जमा झाले.एकंदरीत अतिरिक्त बस रस्त्यावर उतरून ही ठाणे परिवहन सेवेच्या दैनंदिन उत्पनात शुक्रवारी साधारण अडीच ते तीन लाखांची घट झाल्याची चर्चा परिवहन विभागात होती. मध्य रेल्वे कडून आलेल्या पत्रानुसार मेगा ब्लॉकच्या काळात काही मार्गावर आम्ही ५० अतिरिक्त बस सोडल्या होत्या. पण या मेगाब्लॉक ची पूर्वकल्पना असल्याने नागरिकांनी घरी राहूनच काम करणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यावर म्हणावी तितकी गर्दी झाल्याचे दिसून आले नाही. दुपारच्या कालावधीत तर ठाणे परिवहन सेवेच्या अनेक बस या रिकाम्याच होत्या अशी चर्चा सुरू होती.

Web Title: Special bus service to TMC ran empty during the megablock period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.