स्पीड ब्रेकर देतायत अपघातांना निमंत्रण; दुचाकीचालक आणि पादचारी गंभीर जखमी
By प्रशांत माने | Updated: August 18, 2023 17:55 IST2023-08-18T17:55:42+5:302023-08-18T17:55:53+5:30
यश कोंडालकर (वय १८) असे जखमी दुचाकीस्वाराचे तर खोकन माजी (वय ४५) असे जखमी पादचारी व्यक्तीचे नाव आहे.

स्पीड ब्रेकर देतायत अपघातांना निमंत्रण; दुचाकीचालक आणि पादचारी गंभीर जखमी
डोंबिवली : येथील एमआयडीसी, निवासी भागातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी टाकण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळुन झालेल्या अपघातात त्यावरील चालक आणि आणि पादचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. नव्याने टाकलेल्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारले नव्हते. यात स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
यश कोंडालकर (वय १८) असे जखमी दुचाकीस्वाराचे तर खोकन माजी (वय ४५) असे जखमी पादचारी व्यक्तीचे नाव आहे. दोघांना उपचारार्थ खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. डॉ नानासाहेब धर्माधिकारी रोडवरील ओमकार शाळा आणि कोयना सोसायटीजवळ नव्यानेच स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते. अपेक्षेपेक्षा जास्त उंच असलेल्या स्पीड ब्रेकरवर पाढंरे पट्टे मारले गेले नव्हते. यात सकाळी दुचाकीवरून चाललेल्या यशला त्या स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नाही आणि त्याची दुचाकी त्या स्पीड ब्रेकरवर आदळुन काही अंतरापर्यंत घसरत गेली. त्या घसरलेल्या दुचाकीची ठोकर तेथून चालत जाणा-या खोकन यांना बसली. या अपघातात दोघांना गंभीर मार लागला आहे. दरम्यान गुरूवारी रात्री देखील अन्य एक दुचाकीस्वार संबंधित स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने खाली पडून जखमी झाल्याची माहीती स्थानिकांनी दिली. स्पीड ब्रेकर बांधताना ते नियमानुसार असावेत याकडे येथील रहिवाशी राजू नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.
अपघात घडताच मारले पांढरे पट्टे
संबंधित रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएमआरडीए विभागाने केले आहे. त्या रस्त्यावर नुकतेच स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते. दोन दिवसात घडलेले अपघात पाहता रस्ता बनविणा-या कंत्राटदाराला बोलावून घेतले आणि त्याच्याकडून स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारून घेण्यात आले अशी माहीती मनसेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली.