मसाल्याला दरवाढीचा ठसका; रोजच्या जेवणाला महागाईची फोडणी, १० टक्क्यांनी वाढले भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:12 PM2021-03-22T23:12:54+5:302021-03-22T23:13:31+5:30
उन्हाळ्यात मसाल्याचे दर वाढलेले असतात. याच वेळेत मसाले वाळवून ते कुटले जातात. यंदा मागणी जास्त नसतानाही मसाल्याच्या वस्तूंमध्ये दरवाढ मात्र झालेली दिसून येत आहे.
मुरलीधर भवार
कल्याण : भारतीय आहारात मसाल्याचे महत्त्व फार आहे. बाजारात विविध कंपन्यांचे पॅकेट बंद मसाले अगदी दहा रुपयांपासून किलोच्या दरात विकले जात असले तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच वर्षभरासाठी मसाला तयार करून घेतला जातो. प्रत्येक जण त्याच्या खाण्यापिण्याच्या आहार पद्धतीनुसार ते तयार करतो. यंदा मसाल्याच्या किमतीत १० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यात मसाल्याचे दर वाढलेले असतात. याच वेळेत मसाले वाळवून ते कुटले जातात. यंदा मागणी जास्त नसतानाही मसाल्याच्या वस्तूंमध्ये दरवाढ मात्र झालेली दिसून येत आहे. भारतात विविध प्रकारचे मसाले तयार होतात. मात्र, सिंगापूर, इंडोनेशिया या ठिकाणांहून मसाल्याचे पदार्थ भारतात येतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मसाले महागले आहेत. कल्याणला मोठी बाजारपेठ आहे. त्या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ विकले जातात. कल्याणच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे. तर अनेक जण कर्जतला मिरची घेण्यासाठी आवर्जून जातात. त्याठिकाणी मिरची चांगल्या प्रकारची आणि स्वस्त मिळते. वर्षभरासाठी १४ ते १५ किलो वजनाचा मसाला तयार करण्यासाठी अनेक जण जास्तीची मिरची खरेदीसाठी कर्जत व त्यानंतर कल्याणला पसंती देतात.
मिरची येते कुठून?
मसाल्याला लाल मिरची लागते. पांडी, कश्मिरी, बेडगी, साधी अशा विविध प्रकारच्या मिरच्या पश्चिम महाराष्ट्रातून येतात. त्याचबरोबर सगळ्यात जास्त माल हा उत्तर महाराष्ट्रातील नंदूबारमधून येतो. काही मिरच्या कर्नाटकातून येतात. मिरचीचा माल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आला आहे. त्याला बऱ्यापैकी मागणी आहे असे कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याणचे माजी उपसचिव यशवंत पाटील यांनी सांगितले.
गृहिणी काय म्हणतात..
आमच्या घरी दरवर्षी मसाला केला जातो. साधारणत: मार्च महिन्यापासून त्याची तयारी सुरू होते. मसाल्यासाठी मिरची खरेदी करणे. अन्य मसाले आणणे, ते वाळवून, तेलात भाजून त्यानंतर ते कुटण्यासाठी दिले जातात. यंदा, मसाल्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे आमच्या खिशाला झटका बसला आहे. - सुहासिनी वाळुंज
आमच्या घरात पाच सदस्य आहेत. आम्हाला वर्षभरासाठी १३ किलो मसाला लागतो. आम्ही सगळ्या प्रकारचे पदार्थमिश्रित करून बेडगी, लवंगी आणि पांडी अशा तीन प्रकारच्या मिरच्या एकत्रित करतो. त्याचा मसाला तयार करतो. मसाल्याचे दर वाढल्याने यंदा मसाला करणे महागात पडले आहे.- शलाका किल्लेदार
मागच्या वर्षी कोरोनामुळे मसाल्याच्या मार्केटला खूप मोठा फटका बसला होता. यंदा लॉकडाऊननंतर मसाल्याला चांगली मागणी असेल अशी आशा होती. मात्र, १० टक्के दरवाढ झाल्याने ग्राहकांकडून जास्त मागणी नाही. एप्रिल महिन्यात कदाचित मागणी वाढण्याची शक्यता आहे. यंदा मागच्या वर्षापेक्षा जास्त व्यवसाय होऊ शकतो. - सी. पी. शहा