श्री स्वामी समर्थ मठाचा दुसरा वर्धापनदिन सोहळा कल्याणमध्ये संपन्न; ‘श्री स्वामी समर्थ'चा जयघोष
By सचिन सागरे | Published: April 7, 2024 03:46 PM2024-04-07T15:46:08+5:302024-04-07T15:47:10+5:30
भाविकांची होणारी गर्दी आणि उत्साह बघता आगामी काळात या मठाच्या जागेचा विस्तार करणार असल्याची माहिती
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: ‘श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ’चा जयघोष करीत पश्चिमेकडील स्वामी समर्थ मठाचा दुसरा वर्धापनदिन सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. स्वामी समर्थ सारामृताचे २१ अध्यायांचे सामुहिक पठण करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. बिर्ला कॉलेज रोड लगत असलेल्या श्री स्वामी चौकातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्रामार्फत पहाटेपासून स्वामींची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी स्वामींना नैवेद्य दाखवण्यात आला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले.
श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त दोन वर्षांपूर्वी पश्चिमेकडील तानाजी नगर परिसरात श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्यात आले. गेल्या दोन वर्षात या मठाच्या माध्यामातून दिनक्रमानुसार स्वामींची पूजा, याग, सामुहिक हवन यासह अन्य धार्मिक विधी तसेच विविध प्रकारचे सामाजिक कार्ये उपक्रम आयोजित करण्यात आले होते. पूजा, हवन, याग करून मठाचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आल्याचे सेवेकरी रोहिदास गायकर व रविंद्र आढे यांनी सांगितले. शहर परिसरातील शेकडो भाविकांनी यावेळी हजेरी लावून स्वामींचे दर्शन घेतले. भाविकांची होणारी गर्दी आणि उत्साह बघता आगामी काळात या मठाच्या जागेचा विस्तार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.