बस डेपातील एसटी कामगारांचे उपोषण आंदोलन सुरू; ७० बसेस आगारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:17 PM2021-10-28T15:17:38+5:302021-10-28T15:20:55+5:30
ST Buses : आंदोलनामुळे कल्याण बस डेपोचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे ७० बसेस आगारात होत्या.
कल्याण - राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी उपोषण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण बस डेपोतील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन करीत उपोषण सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाही. तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. या उपोषण आंदोलनामुळे कल्याण बस डेपोचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे ७० बसेस आगारात होत्या. या उपोषण आंदोलनाचा फटका प्रवासी वर्गाला बसला आहे.
कल्याण हे शहर दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती केंद्र आहे. तसेच जंक्शन आहे. त्यामुळे कल्याण बस डेपातून दररोज ७० बसेस चालविल्या जातात. या बसेस कल्याण आसपासच्या परिसरासर पुणो, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, बीड, कोकण, उस्मानाबाद, नगर आदी मार्गावर चालविल्या जातात. मध्यरात्रीपासून डेपोतील वाहक, चालक आणि कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. एसटी कामगार संघटने अ. मा. सगभोर, ए. के. अहिरे, जी. आर. थिटे, आर. एस. चंदागी यांनी या उपोषणात सहभाग घेतला आहे. त्यामुळे आज बस डेपोतून एकही बस गाडी परिचलनासाठी बाहेर पडली नाही.
महामंडळाचे सरकारमध्ये विलनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यानचा २ टक्के आणि जानेवारी ते सप्टेंबर २०१९ दरम्यानचा 3 टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जात नाही. दिवाळी पूर्वी महिन्याचे वेतन दिले जावे. दिवाळीसणासाठी दिली जाणारी उचल रक्कम साडे बारा हजार रुपये दिवाळी पूर्वी दिली जावी. दिवाळी भेट १५ हजार रुपये हे दिवाळीपूर्वी दिले जावेत. सरकारच्या अन्य विभागतील कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता, उचल रक्कम, दिवाळी भेट ही वेळेत सणापूर्वी दिली जाते. मग एसटी कर्मचाऱ्यांवरच अन्याय का असा सवाल कर्मचारी वर्गाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
संप करण्यापूर्वी २१ दिवसाची नोटिस आधी प्रशासनाला द्यावी लागते. हा संघटनेने दिलेल्या कॉलनुसार चार कर्मचा:यांनी आंदोलन केले तरी समजू शकते. मात्र सगळेच काम ठप्प करता येत नाही. नोटिस न देता काम ठप्प केल्याने हे उपोषण आंदोलन बेकायदेशीर आहे. कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले आहे. त्याला कर्मचारी प्रतिसाद देत नाही. डेपोतून गाडय़ा बाहेर गेलेल्या नाहीत. काम ठप्प आहे. बाहेर गावी काल मुक्कामी गेलेल्या २३ गाडय़ा परणार असल्याची माहिती कल्याणचे डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली आहे.