भागशाळा मैदानावर फटाक्यांचे स्टॉल खेळाडूंची नाराजी; माजी परिवहन सदस्याचे आयुक्तांना पत्र
By प्रशांत माने | Published: November 5, 2023 06:42 PM2023-11-05T18:42:16+5:302023-11-05T18:42:27+5:30
केडीएमसीने यंदा रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास मनाई केली आहे.
डोंबिवली: केडीएमसीने यंदा रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास मनाई केली आहे. फटाके विक्रेत्यांना मैदान उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शहरात दोन ते तीन मैदान आहेत परंतु खेळण्यासाठी सुस्थितीत असलेले एकमेव भागशाळा मैदानातही फटाके विक्रीचा घाट घातल्याने खेळाडुंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मैदान खेळण्याकरिता की व्यावसायिकरणासाठी असा सवाल करीत सहयांची मोहीम राबवित जाहिर निषेध नोंदवला आहे. शहरातील इतर मैदानांची देखभाल दुरूस्तीअभावी वाताहात झाली असताना परिवहनचे माजी सदस्य तथा मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांच्या पुढाकाराने भागशाळा मैदान सुस्थितीत राहिले आहे.
खेळाडुंना खेळण्यासाठी तर नागरिकांना विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. दरम्यान मैदानात जो फटाके विक्रीचा घाट घातला आहे त्याबाबत म्हात्रे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांना पत्र पाठवून फटाके स्टॉलच्या परवानगीला प्रखर विरोध राहील याकडे लक्ष वेधले आहे. भागशाळा मैदान हे डोंबिवली पश्चिमेचे एकमेव खेळाचे मैदान आहे. जिथे फेरफटका मारण्याबरोबरच मोकळा श्वास घेता येतो. असे असताना तिथे फटाका विक्रीचा घाट घातला जात आहे. त्यामुळे चालायला येणारे जेष्ठ नागरिक, खेळणारे तरुण तरुणी व बच्चे कंपनी हे मैदानातील दिवाळी सुट्टीच्या आनंदाला मुकतील असं आमचं ठाम मत आहे. या तुमच्या फटाके स्टॉलच्या परवानगीला आमचा प्रखर विरोध राहील. कृपया स्टॉल धारकांना मैदानावर परवानगी देऊ नये असे निवेदन म्हात्रे यांनी आयुक्तांना दिले आहे.