प्रस्तावित मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी- कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 05:30 PM2022-07-11T17:30:38+5:302022-07-11T17:30:59+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
डोंबिवली: प्रस्तावित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश सोमवारी दिले. पाटील यांच्याकडून कल्याणहून मुरबाडपर्यंत रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा केला जात आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच या मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये पाटील यांनी केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. त्यानंतर फडणवीस यांची पाटील यांनी मुंबईत सोमवारी भेट घेतली. तसेच नियोजित रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी देण्याची विनंती केली. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे.
मुरबाडवासियांना रेल्वेसेवा देण्यास भाजपा कटीबद्ध आहे, असे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात ५० टक्के वाटा उचलण्यासंदर्भात हमी देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. या निर्णयामुळे नियोजित मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा निधी मिळणार असल्यामुळे कामाला निश्चितच वेग येईल. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी आहोत, असे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.