डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 20 लाखाची मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 10:56 PM2021-10-03T22:56:07+5:302021-10-03T22:56:26+5:30
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची मागणी; रिपाईतर्फे पिडीतेच्या कुटुंबियांना 1 लाखाची मदत
कल्याण-मुंबईतील साकीनाका बलात्कारापेक्षा डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 20 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिली.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात भेट देऊन पोलिस अधिका:यांची चर्चा केली. या चर्चेच्या पश्चात मंत्री आठवले यांनी उपरोक्त माहिती दिली. मंत्री आठवले यांनी पिडीतेच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये मदतीचा धनादेश दिला आहे. डोंबिवलीतील नागरीकांनी पुढे येऊन या पिडीत कुटुंबांला आर्थिक मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी यावेळी केले आहे. त्याचबरोबर सरकारकडून पिडीतेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. मात्र साकीनाका प्रकरणापेक्षा हे प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबाला साकीनाका प्रकरणाप्रमाणेच 20 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने करावी. दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाच्यावेळी मी संसदेत होतो. अशा गंभीर स्वरुपाच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असा कायदा केंद्र सरकारने केला आहे. या प्रकरणातील 33 आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी. येत्या सहा महिन्यात हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना शिक्षा दिली जावी. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या वतीने निषेध करतो असे यावेळी मंत्री आठवले यांनी सांगितले.
फोटो-कल्याण-रामदास आठवले.