जिथे काम करायचा तिथेच केली चोरी; मॅनेजरनेच चोरले महागडे मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:36 PM2023-11-07T18:36:26+5:302023-11-07T18:36:54+5:30
ऑडीटमुळे चोरी उघड, आरोपी अटक
डोंबिवली - येथील रिलायन्स माय जिओ मोबाईल स्टोअरमधील मॅनेजरने तेथील ९४ हजार ५३३ रूपये किमतीचे चार महागडे मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. या मॅनेजरला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. हर्षद हरयाण (वय ३०) असे अटक मॅनेजरचे नाव आहे. हा चोरीचा प्रकार २७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत घडला होता. दरम्यान कंपनीच्या ऑडीटमध्ये मोबाईल चोरीला गेल्याचे उघड झाले होते.
हर्षद हा डोंबिवली पुर्वेकडील मिलापनगरमधील कावेरी स्वीटच्या बाजुला असलेल्या रिलायन्स माय जिओ स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होता. कालांतराने तेथील काम त्याने सोडले. दरम्यान तो काम करीत असल्याच्या कालावधीत मोबाईल स्टोअरमधील आयफोन मोबाईल, रिअल मोबाईल, रेडमी नोट आणि व्हीवो असे चार ९४ हजार ५३३ रूपये किमतीचे महागडे मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या चोरीप्रकरणी अजित सिंग यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्हयाचा तपास मानपाडा पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस देखील करीत होते. या गुन्हयाच्या तपासकामी वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राहुल मस्के, पोलिस हवालदार अनुप कामत, विश्वास माने, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, पोलिस नाईक सचिन वानखेडे,, विनोद चन्ने, गुरूनाथ जरग यांचे पथक नेमले होते. दरम्यान पोलिस नाईक सचिन वानखेडे यांना मिळालेल्या माहीतीनुसार संबंधित पथकाने अवघ्या २४ तासात डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर भागात सापळा लावून हर्षदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेले चार मोबाईल हस्तगत केले आहेत. सध्या हर्षदला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
म्हणून त्याने चोरले मोबाईल
हर्षदचा मुंबईत मोबाईल शॉप होता. परंतू कोरोनात त्याचा व्यवसाय बुडाला आणि तो कर्जबाजारी झाला होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. तो येथील रिलायन्स माय जिओ मोबाईल स्टोअरमध्ये कामाला लागला तेव्हा त्याने कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरण्याचा बेत आखला आणि तो तडीस देखील नेला पण कंपनीच्या ऑडीटमध्ये चोरीचा प्रकार उघड झाला अशी माहिती पोलिस निरिक्षक राहुल मस्के यांनी दिली.