१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:01 AM2024-02-29T10:01:03+5:302024-02-29T10:01:09+5:30
दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दररोज रेल्वेने प्रवास करताना चाकरमान्यांचे हाल होतात. रविवारी सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह बाहेर पडल्यानंतरही त्यांना डबल हाल सहन करावे लागतात. १७ वर्षांपासून मेगाब्लॉकमुळे होणारे हे मेगाहाल आता असह्य होत आहेत. त्यामुळे उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करून पूर्ण क्षमतेने रेल्वेसेवा द्यावी, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.
दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात. तर पश्चिम रेल्वेचे सुमारे ३१ लाख प्रवासी असतात. मेगाब्लॉकचा ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना सर्वाधिक फटका बसत असतो. कल्याण ते कसारा, कर्जतच्या प्रवाशांना त्याचा त्रास होतो. शहरातील प्रवासी अन्य पर्यायाने पुढे जातात. परंतु ग्रामीण भागातील प्रवासी मात्र रेल्वेशिवाय प्रवास करू शकत नाहीत. परिणामी सर्व स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यात लोकल फेऱ्यांची कपात केल्यामुळे प्रवासी ठिकठिकाणी स्थानकात ताटकळतात. त्यात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींचे
हाल होतात.
अंमलबजावणी अशक्य
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, देखभाल करण्यासाठी ब्लॉक घ्यावाच लागतो. त्यातून रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा, रेल्वे फलाट, ओव्हर हेड वायर, लोकल डबे, क्रॉसिंग, खडी यांसह अन्य तांत्रिक देखभाल दुरुस्ती आदी कामे करावी लागतात, ती कामे अन्य दिवसात करता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी जरी मागणी केली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, ती मागणी फारशी रास्त नाही, असेही एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दररोज लोकल फेऱ्या
n मध्य रेल्वे मुंबई ते कसारा १२० किमी, मुंबई ते कर्जत १०० किमी, खोपोली सुमारे ११४ किमी असा मार्ग आहे. पनवेलपर्यंत ६६ किमी असा मार्ग आहे.
n पश्चिम रेल्वेवर चर्चगेटपासून विरारपर्यंत सुमारे ६० किमीचा डहाणूपर्यंत १२४ किमीचा रेल्वे मार्ग आहे. या दोन्ही मध्य रेल्वेवर प्रतिदिन सुमारे १८१० लोकल फेऱ्या, पश्चिम रेल्वेवर १३९४ लोकल फेऱ्या दुतर्फा धावतात.
n साधारणपणे मुंबई-कसारा ३७ रेल्वे स्थानके, कर्जतपर्यंत ३५, खोपोलीपर्यंत ४० स्थानकांचा समावेश आहे. पनवेलपर्यंत ३१ आणि त्यापुढे रोहापर्यंत ४१ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.