भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षांच्या मुलावर जीवघेणा हल्ला, घेतले १८ चावे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 10:42 PM2022-01-01T22:42:37+5:302022-01-01T22:43:14+5:30
मुलावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु
कल्याण-कल्याण मलंग रोडवरील द्वारली गावात राहणाऱ्या तुषार सुहास निंबोरे या चार वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी काल नववर्षाच्या पूर्व संध्येला जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. भटक्या कुत्र्यांनी त्याला १८ चावे घेतले आहेत. त्याच्यावर कळवा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे मुलगा भयभीत झाला आहे.
द्वारली गावातील आदित्य इमारतीत राहणारा तुषार हा त्याच्या घराशेजारी काल सायंकाळी खेळत होता. त्याठिकाणी खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याच्यावर हल्ला केला. या हल्याने एकदम गडबडून जाऊन भयभीत झालेल्या तुषारने आरडाओरड सुरु करताना नागरीकांनी तुषारच्या दिशेने धाव घेतली. नागरीकांनी भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून तुषारला सोडविले. तोर्पयत भटक्या कुत्र्यांनी तुषारच्या अंगाला १८ ठिकाणी चावे घेतले होते. त्याच्या पालकांनी तुषारला डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेते होते. त्याठिकाणी तपासणीकरीता डॉक्टर नसल्याची माहिती समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी महापालिकेच्या रुग्णलायात डॉक्टर नसल्याबाबत आरोग्य सोयी सुविधांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे ही बाब या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाली आहे. महापालिका हद्दीत गेल्या नऊ नहिन्यात ९ हजार ४४ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर महापालिका कोटय़ावधी रुपयांचा खर्च करते. मात्र तरी देखील भटक्या कुत्र्यांचे प्रजनन नियंत्रणात आले नसल्याने त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे.