जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक : नंदिनी जाधव
By सचिन सागरे | Published: November 7, 2023 05:05 PM2023-11-07T17:05:28+5:302023-11-07T17:06:09+5:30
डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष संघर्ष करून हा कायदा व्हावा याकरिता प्रयत्न केलेत.
कल्याण : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर संमत झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होणे अत्यावश्य असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव यांनी येथे व्यक्त केले. डॉ. दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनी २० ऑगस्ट रोजी पुणे येथून सुरू केलेल्या जादूटोणाविरोधी राज्यव्यापी जनप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने कल्याण येथील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपले विचार मांडले.
डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष संघर्ष करून हा कायदा व्हावा याकरिता प्रयत्न केलेत. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात दिड हजाराहून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहेत. आजूबाजूला समाजात घडणाऱ्या घटनांची संख्या पाहता दाखल गुन्ह्यांची संख्या ही फार कमी आहे आणि म्हणूनच या कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र, मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहे. तरी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा अशी मागणी जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने जाधव यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त गणेश चिंचोले, राज्य सल्लागार मंडळाचे सदस्य श्यामकांत जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष डी. जे. वाघमारे, ठाणे जिल्हा सचिव अश्विनी माने यांच्यासह जिल्हा व राज्य विभाग सदस्य उपस्थित होते.