टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई
By अनिकेत घमंडी | Published: May 3, 2024 04:13 PM2024-05-03T16:13:42+5:302024-05-03T16:14:19+5:30
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे.
डोंबिवली: एप्रिल महिन्यात महावितरणच्या टिटवाळा, अंबरनाथ पूर्व आणि वाडा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. टिटवाळा उपविभागात १२४ जणांविरुद्ध कारवाई करून ४१ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. अंबरनाथ पूर्व उपविभागात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या १९ ग्राहकांकडे २६ लाख ३५ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. तर वाडा उपविभागात तब्बल १०४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे. त्यानुसार टिटवाळा उपविभागातील जीआर नगर, बल्याणी गाव, आंबिवली रोड, वैष्णवी देवी चाळ, गुरुवली पाडा, शिवनगरी चाळ भागात एकाच दिवशी राबवलेल्या शोध मोहिमेत १२४ जणांकडे सुरू असलेल्या वीजचोऱ्या शोधण्यात यश आले. या १२४ जणांकडून सुमारे ४१ लाख रुपये किंमतीची १ लाख ८० हजार ८८१ युनिट विजेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे यांच्या पथकांने ही कारवाई केली. अंबरनाथ पूर्व उपविभागात ३३३७ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात १९ वीज मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले. या १९ ग्राहकांनी २६ लाख ३५ हजार रुपये किंमतीची ९८ हजार ९९६ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, सहाय्यक अभियंते वैशाली पाटील, प्रशांत नाहीरे, हरेश विशे, प्रतिक म्हात्रे, मोहित ठाकुर, रविंद्र नाहिदे, सहायक लेखापाल मयुरी बोरसे यांच्या पथकांनी ही कारवाई केली. तर वाडा उपविभागात वाडा शहर आणि ग्रामीण, गोऱ्हा, अंबाडी, कुडूस आदी भांगामध्ये राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत १०४ जणांकडे विजेचा चोरटा वापर आढळून आला. या १०४ जणंनी १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमेचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. वाड्याचे उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार, सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र तसेच सुरक्षारक्षक यांच्या चमुने ही कामगिरी केली.