संप सुरूच... कल्याण बस डेपोत पोलीस बंदोबस्त, प्रवाशांचे हाल सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 02:46 PM2021-11-27T14:46:53+5:302021-11-27T14:47:37+5:30
कल्याण डेपोतून पाच बस भिवंडीच्या दिशेने रवाना
कल्याण - राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारममध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात कल्याण व विठ्ठलवाडी बस डेपोतील कामगार सहभागी झाले होते. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केल्यावर हा संप मिटरणार असल्याची आशा व्यक्त केली जात होती. मात्र हा संप काही मिटलेला नाही. कल्याण बस डेपोत 7 कामगार कामावर हजर झाल्याने कल्याण ते भिवंडी मार्गावर पाच बसेस रवाना झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. मात्र विठ्ठलवाडी बस डेपोतून एकही गाडी आज धावलेली नाही. तसेच कल्याण बस डेपोतून एकही लांब पल्ल्याची गाडी रवाना झालेली नाही.
कल्याण बस डेपोत काही कामगार संप करीत असल्याचे दिसून आले. मात्र त्याठीकाणी संप संपुष्टात आला आहे की नाही याविषयीची काही एक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यांचा संप सुरुच होता. कल्याण बस डेपोतील व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी सांगितले की, राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कामगारांनी कामावर यावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन वाहक आणि पाच चालक कामावर हजर झाल्याने कल्याण ते भिवंडी मार्गावर सकाळपासून पाच बसेस सोडण्यात आल्या आहेत.
७ नोव्हेंबरपासून डेपोतून एकही बस धावली नव्हती. जसे जसे कामगार कामावर हजर होतील त्यानुसार लांब पल्लाच्या गाडय़ा सुरु केल्या जाणार आहेत. कल्याण बस डेपोत ८७ चालक आणि ७० वाहक आहेत. तसेच वाहक आणि चालकांचे दोन्ही प्रकारचे काम करणारे ११३ कामगार आहेत. एसटी प्रवाशावर आजही प्रवाशांचा विश्वास आहे. त्याला कामगारांनी तडा देऊ नये. त्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन केले आहे असे आवाहन केले आहे.
डेपोत पोलीस बंदोबस्त
दरम्यान बस डेपोत एक पोलिसांची व्हॅन उभी आहे. पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे. संप संपुष्टात आला की नाही याविषयी आम्हाला काही माहिती नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, डेपोत संपावर बसलेल्या कामगारांना डेपो बाहेर काढण्यात यावे. तसेच त्यांच्या म्होरक्यांना ताब्यात घ्यावे असे, पत्र डेपो व्यवस्थापनाकडून पोलिसांना देण्यात आले आहे.
दबावापोटी बस माघारी घेतल्या
विठ्ठलवाडी बस डेपोचे व्यवस्थापक वाय. एस. मुसळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सकाळच्या सत्रात दोन कर्मचारी हजर झाले होते. मात्र, त्यांनी सुद्धा दबावापोटी हाती घेतलेल्या गाड्या पुन्हा डेपोत जमा केल्या आहेत. त्यामुळे विठ्ठलवाडी बस डेपोतून एकही बस धावलेली नाही. संप काही संपुष्टात आलेला नाही. कामगारांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद नसल्याने एकही लांब पल्ल्याची गाडी डेपोतून बाहेर रवाना झालेली नाही.