जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
By अनिकेत घमंडी | Published: May 2, 2024 04:12 PM2024-05-02T16:12:31+5:302024-05-02T16:13:49+5:30
फडके पथ येथील श्री गणेश मंदिर संस्थानात बाप्पाचे सपत्नीक दर्शन घेऊन शिंदे यांनी रॅलीला सुरुवात केली.
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी काढलेल्या रॅलीला प्रतिसाद मिळाला. फडके पथ येथील श्री गणेश मंदिर संस्थानात बाप्पाचे सपत्नीक दर्शन घेऊन शिंदे यांनी रॅलीला सुरुवात केली.
फडके पथ, बाजीप्रभू चौक, छत्रपती शिबाजी महाराज पुतळा मार्गे मानपाडा चार रस्ता टिळक पथ, शेलार नाका, घरडा सर्कल तेथून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत रॅली निघाली. त्यावेळी विकास रथावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, प्रमोद हिंदुराव, आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर आणि महायुतीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, चेन्नई, कर्नाटक आदी राज्यांची संस्कृती दर्शवणारे झांज, ढोल ताशा, लेझीम, भांगडा आदी वाद्य, नृत्य दर्शवणारे पथक रॅलीत सहभागी झाली होती. शिंदे यानो फडके पथवरून रॅली आल्यावर इंदिरा गांधी चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला, छत्रपती शिवाजी महाराज आदी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
शुभारंभ पासून भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. डीजे, बँजो वादकानी देखील जय जय महाराष्ट्र माझा, वेडात मराठे वीर दौडले सात आदी गाण्यांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ताल धरला. सर्वपक्षीय झेंडे, मुखवटे रॅलीचे आकर्षण ठरले. भगवा शेला, टोप्या अनेकांनी घातल्या. फडके रस्त्यावरून निघताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संपूर्ण राज्यात महायुतीची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात कडक्याच्या उन्हात देखील कार्यकर्ते प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते.