माझी आवडती ऐतिहासिक वास्तू चित्रकला स्पर्धेत केसी गांधी, मॉडेल, विद्यानिकेतन, वाणी विद्याशाला शाळेचे विद्यार्थी चमकले
By अनिकेत घमंडी | Published: October 17, 2023 04:42 PM2023-10-17T16:42:58+5:302023-10-17T16:43:24+5:30
डोंबिवली - दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टसच्या कल्याण डोंबिवली सेंटर ने ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान डोंबिवली, कल्याण, आणि सभोवतालच्या ...
डोंबिवली - दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टसच्या कल्याण डोंबिवली सेंटर ने ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान डोंबिवली, कल्याण, आणि सभोवतालच्या परिसरामधील एकूण १९ शाळांमधे आठवी ते दहावी च्या मुलांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेचा विषय “माझी आवडती ऐतिहासिक वास्तू आणि का” असा होता. त्यामध्ये इयत्ता ८ वी मध्ये द्रष्टी चांदे, मॉडेल इंग्लिश स्कूल पांडुरंग वाडी, ९ वी मध्ये अक्षरा गुजर के. सी. गांधी इंग्लिश स्कूल, कल्याण, १० वी मध्ये विभावरी ओझा श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, कल्याण यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
८वीमधील द्वितीय पारितोषिक वेदी शिवगण सेंट मेरी हायस्कूल, डोंबिवली, व तृतीय पारितोषिक महर्षी फापळे ओंकार इंग्लिश मेडियम स्कूल ह्यांना मिळाले. ९वी मध्ये द्वितीय पारितोषिक निधी वापारी विद्या निकेतन स्कूल व तृतीय पारितोषिक यशश्री हाके जीईआय चे सुभेदार वाडा हायस्कूल ह्यांना मिळाले. दहावीमध्ये द्वितीय पारितोषिक गौरी पराते के. सी. गांधी इंग्लिश स्कूल, व तृतीय पारितोषिक आभा उंटवाले विद्या निकेतन स्कूल, ह्यांना पारितोषिक मिळाल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. मुलांनी भारतामध्ये असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूचे चित्र काढून ती वास्तू त्यांना का आवडते हे एक ते दोन वाक्यांमध्ये वर्णन करायचे होते. ह्या स्पर्धेमध्ये १९ शाळांमधून ५३७ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
दर वर्षी ऑक्टोबर महिन्यातील पहिला सोमवार 'जागतिक वास्तुकला दिवस' म्हणून जग भर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने स्पर्धा घेण्यात।आली. संस्थेच्या वतीने अध्यक्ष वास्तुविशारद केशव चिकोडी, उपाध्यक्ष वास्तुविशारद धनश्री भोसले, सचिव वास्तुविशारद उदय सातवळेकर, आणि त्यांचे सहकारी ह्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन ही स्पर्धा आयोजित केली व ह्या निमित्ताने मुलांना आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू आणि वास्तुकलेबद्दल मार्गदर्शन केले. ह्या स्पर्धेमध्ये १९ शाळांपैकी २ शाळा ह्या विकलांग विद्यार्थ्यांच्या होत्या. ह्या दोन शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे सर्व सामान भेट देण्यात आले. तसेच ह्या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये रंगकाम करण्याची स्पर्धा घेतली गेली. विकलांग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक स्वराज माने (क्षितिज स्कूल, डोंबिवली पश्चिम), द्वितीय पारितोषिक सूरज साळवी (क्षितिज स्कूल, डोंबिवली पश्चिम) व तृतीय पारितोषिक मोहित सोडे (क्षितिज स्कूल, डोंबिवली पश्चिम) ह्यांना मिळाले. ह्या स्पर्धेचे परिक्षण चित्रकार राम कस्तुरे व चित्रकार उमेश पांचाळ ह्यांनी केले.