विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे: केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
By अनिकेत घमंडी | Published: October 18, 2022 03:17 PM2022-10-18T15:17:11+5:302022-10-18T15:17:54+5:30
छत्रपती शिक्षण संस्थेच्या १० हजार विद्यार्थ्यांनी लिहिली पंतप्रधानांना "धन्यवाद पत्र"
कल्याण (प्रतिनिधी) आपल्या देशाला मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला असून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवून देश उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर शाळेत झालेल्या धन्यवाद मोदी उपक्रमात कपिल पाटील बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी, उपाध्यक्ष एन के फडके, भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे, भारती वेदपाठक, संस्थेचे मार्गदर्शक बाबा जोशी, माजी सरचिटणीस मनोहर ठाकुरदेसाई, कार्यकारणी सदस्य किशोर आल्हाट, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, मुख्याध्यापक संपत गीते आदी उपस्थित होते.
पुढील २० वर्षाचा वेध घेत देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले, देशातील शाळा अद्ययावत व्हाव्यात यासाठी देशभरातील १४ हजाराहून अधिक "पीएम श्री शाळा" करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून शिक्षणाच्या माध्यमातून देशाला महासत्ता बनविण्याचे पंतप्रधानांनी ठरविले असल्याचे कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद करतांना सांगितले.
छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिक्षण संस्था नागरी, सागरी तसेच वनवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करीत असून अनेक अडचणींवर मात करून संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवीत असल्याचे डॉ नंदकिशोर जोशी यांनी सांगितले.
अनिल बोरनारे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात पत्रे लिहून पंतप्रधानांना पोहचविण्याचे भाजपाचे धन्यवाद, मोदीजी अभियान सुरू केले आहे. छत्रपती शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने शैक्षणिक लाभार्थी विद्यार्थ्यांचे पत्र लिहिण्याचा उपक्रम सुरू केला असून छत्रपती शिक्षण मंडळातील विविध शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थी व इतर शाळांमधील २ हजार विद्यार्थ्यांनी मोदींजींना पत्रे लिहिली ही पत्रे एका व्हॅन ने प्रदेश कार्यालयाला पाठविली जाणार असून त्या व्हॅन ला हिरवा झेंडा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दाखविला.
लवकरच ठाणे जिल्ह्यातून अजून २५ हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थी लिहिणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य एन के फडके तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संपत गीते यांनी मांडले. संस्थेचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे व इतर पदाधिकाऱ्यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"