कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीकरणाची 'ड्राय रन' यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 02:45 PM2021-01-08T14:45:43+5:302021-01-08T14:46:51+5:30
corona vaccination in Kalyan-Dombivali : लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षक कक्ष याची रचना तयार करण्यात आली आहे.
कल्याण : सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कल्याणडोंबिवली महापालिकेने कोरोना लसीकरणाची यशस्वी 'ड्राय रन' घेतली. कोळसेवाडी व पाटकर आरोग्य केंद्रात ही 'ड्राय रन' आज घेण्यात आली.लसीकरण कशा प्रकारे करण्यात येईल, याची पूर्व तयारी म्हणून ही ड्राय रन घेण्यात आली आहे.
या 'ड्राय रन'मुळे लसीकरण कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे. महापालिकेने लसीकरणाचे २० लाभार्थी तयार करुन त्यांना 'ड्राय रन'चा मेसेज पाठविला होता, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी दिली.
निवडणूक पॅटर्नप्रमाणे कोरोना लसीकरणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षक कक्ष याची रचना तयार करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सुरक्षा रक्षक आणि तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध आणि व्याधीग्रस्त लाभार्थींना लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्प्या टप्प्याने दररोज १०० लाभार्थींचे लसीकरण केले जाणार आहे.
आज घेण्यात आलेल्या 'ड्राय रन'वेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. वैशाली काशीकर, डोंबिवलीचे उपायुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर आदी उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. किशोर चव्हाण यांनी 'ड्राय रन'वेळी नागरी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच, 'ड्राय रन'विषयी समाधान व्यक्त केले.