दिवा, टिटवाळा स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेने मागवल्या प्रवाशांकडून सूचना
By अनिकेत घमंडी | Published: August 2, 2023 05:42 PM2023-08-02T17:42:33+5:302023-08-02T17:43:16+5:30
रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत टिटवाळा, दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे.
डोंबिवली: दिवा रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत आणि स्थानकाच्या डागडुजीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या नंतर रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत टिटवाळा, दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे. त्यामुळे या योजनेत दिवा स्थानकाचा समावेश झाल्या नंतर त्यासोबत रेल्वेच्या अन्य स्थानकांचा देखील समावेश केला आहे. त्यामुळे आता दिव्यातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असून काय सुविधा हव्यात याबाबत सूचना करण्याचे आवाहन रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
मंगळवारी हे आवाहन आल्यानंतर त्याची दखल घेत राजू पाटील यांनीही जास्तीतजास्त नागरिकांना याबाबतची माहिती व्हावी यासाठी संवाद साधून जनजागृती केली. मध्य रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र प्रवाश्यांना प्रवासादरम्यान स्थानकांवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या तक्रारींचे गार्हाणे पाटील यांनी मांडल्या होत्या. त्यानंतर तातडीने या दिवा स्थानकाचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेत करण्यात आला. त्यामुळे आता दिवा, टिटवाळा स्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांकडून स्थानकांच्या नुतनीकरणा संदर्भात सूचना मागवल्या आहेत. यासाठी रेल्वेने संकेत स्थळ प्रसिद्ध केली आहेत. पाटील यांच्यासोबत रेल्वे संघटनांनी देखील या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणासाठी प्रवाश्यांनी आपल्या सूचना नोंदवण्याचे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत दिवा स्थानकासह अन्य रेल्वे स्थानकांचा जलदगतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे.