छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात
By प्रशांत माने | Published: September 10, 2023 04:46 PM2023-09-10T16:46:09+5:302023-09-10T16:46:19+5:30
मित्राने छेडछाड केल्याने धास्तावलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेत शनिवारी रात्री घडली.
कल्याण : मित्राने छेडछाड केल्याने धास्तावलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेत शनिवारी रात्री घडली. मित्र-मैत्रीणींसोबत असताना तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार घडला होता. दरम्यान याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना बाजारपेठ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चार दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलगी तिच्या काही मित्र मैत्रीणींसमवेत मेट्रो मॉलमध्ये गेली होती. मॉलच्या नजीक एका मित्राचे घर असल्याने ते सर्व नंतर त्याच्याकडे गेले.
तेथे ते सर्वजण हुक्का पियाले. त्यावेळी एका मित्राने इतरांना घराबाहेर थांबा असे सांगुन संबंधित मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगितले. त्यावेळी छेडछाडीचा प्रकार घडला. त्याला झिडकारले आणि नकार देत ती घरी परतली. या घडलेल्या प्रकारामुळे मुलगी प्रचंड धास्तावली होती. तीने घडलेला प्रकार तीच्या एका मैत्रीणीला सांगितला पण त्या घडलेल्या प्रकारापासून ती घरी कोणाशीच बोलत नव्हती. बहिण मानसिक तणावात दिसत असल्याने तिच्या भावाने तिला विचारणा केली. तेव्हा तीने भावाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याने तीला समजावत घडलेला प्रकार आपण वडीलांना सांगू असे सांगितले. परंतू काही वेळातच तीने घाबरुन गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकाराबाबत तीच्या घरच्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली असून पोलिसांनी भादंवि ३०६ , ३५४, ३४ पोक्सा ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करीत तपासाला सुरूवात केली आहे. यात तीघा अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलीसोबत छेडछाड झाली की, तिच्यासोबत आणखी काही गैरप्रकार घडला आहे. हे तिच्या शवविच्छेदन अहवालापश्चात कळणार आहे. अहवालात काही आढळून आल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल अशी माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुनील पवार यांनी दिली.