कल्याण पश्चिमेत लवकर सुरू हाेणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
By मुरलीधर भवार | Published: September 6, 2024 01:57 PM2024-09-06T13:57:36+5:302024-09-06T13:58:25+5:30
आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली पाहणी.
मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे लवकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी आज शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी केली. हे हॉस्पिटल सुरु करण्यासाठी आमदार भाेईर यांनी पाठपुरावा केला होता.
हॉस्पिटलसाठी गौरीपाडा येथे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर ही तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्याठिकाणी १६ हजार चौरस फूटाची जागा आहे. १०० बेडचे हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे.
आमदार भोईर यांनी विधानसभा निवडणूकीच्या जाहिरनाम्यात कल्याण पश्चिमेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील जाहिर सभेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यास होकार दिला होता. पीपीपी तत्वावर हॉस्पीटल उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सर्व अद्ययावत सुविधांसह हृदय विकारावरील उपचारांसाठी सुसज्ज अशी कॅथ लॅब ही उभारण्यात येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सल्लागार नेमण्यात आला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली होणार आहे.या रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत (आयुष्मान भारत अंतर्गत पात्र लाभार्थी) सर्व आजारांवर मोफत तर त्यात न बसणाऱ्या आजारांवर अत्यल्प दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत.
या पाहणी दौऱ्यावेळी केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, माजी नगरसेवक गणेश जाधव, डॉ. धीरज पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, विभागप्रमुख अंकुश केणे, शाखाप्रमुख अशोक भोईर आणि केडीएमसीचे माजी उपआयुक्त प्रकाश गव्हाणकर उपस्थित होते.