केडीएमसी आयुक्तांची सुट्टीदिवशी सरप्राईज व्हिजीट, सगळेच अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:36 PM2021-06-12T19:36:29+5:302021-06-12T19:36:48+5:30
आयुक्तांनी मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयुक्त पदाचा पदभार घेतल्यावर डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील फेरीवाल्यांचा नागरिकांना कसा त्रास होतो. धक्के खात कसे चालावे लागते.
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी शनिवारी सुट्टीदिवशी अचानाक डोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या दोन प्रभाग क्षेत्र कार्यालयांना भेट दिली. त्यामुळे अधिकारी वर्गाची तारांबळ उडाली होती.
आयुक्तांनी मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयुक्त पदाचा पदभार घेतल्यावर डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील फेरीवाल्यांचा नागरिकांना कसा त्रास होतो. धक्के खात कसे चालावे लागते. त्याचबरोबर कल्याण रेल्वे स्थानकातील भल्या मोठ्या स्काय वॉकचाही दौरा केला होता. रात्रीच्यावेळी केलेला त्यांचा सरप्राईज दौरा चर्चेचा विषय ठरला होता. आज शनिवार रविवार सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत की, नाही त्याचबरोबर डोंबिवली विभागाची पाहणी करण्यासाठी आयुक्त दुपारी बाहेर पडले होते.
आयुक्तांनी स्टेशन परिसरातील दोन प्रभाग क्षेत्र कार्यालये जी जुनी आणि धोकादायक झाली आहेत,त्याची पाहणी केली. त्यापैकी फ प्रभाग कार्यालय हे पी. पी. चेंबर्स येथे हलविण्यात यावे. तर ग प्रभाग कार्यालय हे सुनिल नगर येथे आरक्षित असलेल्या महापालिकेच्या वास्तूत हलविले जावे, असे आदेश संबंधित अधिकारी वर्गास दिले आहेत. त्यांच्या सरप्राईज व्हिजीटवेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि उपायुक्त पल्लवी भागवत सोबत होत्या. मात्र, आयुक्त अचानक आल्याने सुरक्षा रक्षकांसह अन्य कर्मचारी वर्गाची तारांबळ उडाली होती. सुनिलनगरमधील पार्किग, भाजी मंडई आणि वाचनालयाच्या जागेची पाहणी आयुक्तांनी केली. त्यानंतर ९० फूटी रस्त्यावरील बालाजी आंगण या इमारतीत शॉपिंग मॉल या आरक्षणांतर्गत उपलब्ध असलेल्या १ हजार चौरस फूट जागेची पाहणी करुन ही जागा भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात यावी असे उपायुक्त भागवत यांना यावेळी आदेश दिले आहे.
दावडी परिसरातील रिजेन्सी इस्टेट या बडय़ा गृहसंकुलात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प १ मे पासून सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाची पाहणीदेखील आयुक्तांनी केली. त्याचबरोबर एमआयडीसी शिळ फाटा येथे कंपोस्ट खत प्रकल्प सुरु करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्लाटची पाहणी आयुक्तांनी केली.