अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:10 AM2024-09-16T00:10:20+5:302024-09-16T00:11:11+5:30
पक्षफुटीनंतरचे हेवेदावे बाजूला सारत दोन्ही गटाचे पदाधिकारी हसतमुखाने एकमेकांना भेटले
मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण डोंबिवली: शहर आणि इथले राजकारण कायमच संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर सर्वाधिक पडसाद कल्याण डोंबिवलीत उमटले. अगदी मध्यवर्ती शाखेच्या ताब्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र डोंबिवलीतल्या राजकीय वर्तुळात रविवारचा दिवस हा काहीसा गंमतीशीर आणि राजकारणापलीकडचा ठरला.
याचं कारण म्हणजे ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी विविध खाजगी कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेच्या जुन्या आठवणींचा उल्लेख करत दोन्ही शिवसेनेच्या गटात गप्पा रंगल्या.
रविवारी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोंबिवलीतील ठाकरे गटाचा प्रमुख चेहरा अशी ओळख असलेले सदानंद थरवळ आणि इतर पदाधिकारी म्हात्रे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी जुनी शिवसेना, त्यावेळचे इतर गंमतीदार किस्से इत्यादी गोष्टींचा उल्लेख करत अनेक जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचाही वाढदिवस होता. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मध्यवर्ती शाखेमध्ये मोठी गर्दी झाली होती. ठाकरे गटाचे मुकेश पाटील यांनीही शाखेमध्ये येत राजेश मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पक्षफुटीनंतर कितीही आरोप प्रत्यारोप हेवेदावे झाले असले तरी रविवारी मात्र दोन्ही ठिकाणी सर्व गोष्टी बाजूला सारत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी हसतमुखाने एकमेकांना भेटले.
आता या भेटी खाजगी असल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय जोडे बाजूला ठेवून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी केवळ मैत्रीखातर एकमेकांना मदत करणार का? अशा एक ना अनेक चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.