सुषमा स्वराज आणि अरुण जेटली ही देशाची दोन अनमोल रत्ने : मेधा किरीट
By अनिकेत घमंडी | Published: December 23, 2023 04:37 PM2023-12-23T16:37:06+5:302023-12-23T16:38:35+5:30
अग्निशिखा आणि अरुणिमा, अरुण जेटली व्यक्ती आणि विचार दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन
डोंबिवली: दिवंगत भाजप नेत्या, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि प्रख्यात अर्थतज्ञ अरुण जेटली ही दोन देशाची अनमोल रत्ने म्हणून चिरंतन समरणात राहतील. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका मेधा किरीट सोमेय्या लिखित अग्निशिखा आणि अरुणिमा, अरुण जेटली व्यक्ती आणि विचार या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थानाच्या आवरातील सभागृहात संपन्न झाले, त्यावेळी त्यांनी दोन्ही दिगग्ज नेत्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला, त्यांच्या सहवासातले काही किस्से त्यांनी यावेळी सांगितले.
भारताच्या प्रगतीच्या वाटेवरील दोन चंद्र म्हणजे, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली. या दोन्ही नेत्यांनी संसद गाजवली. सर्वसामान्य जनतेसाठी दोघंही लढले. दोघांचेही स्थान अढळ चंद्रासारखे आहे. त्यांचे कार्य आणि लोकप्रियता ही पुस्तकाच्या रुपानं कायम राहिल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. पै फ्रेंण्डस लायब्ररीच्या पुढाकाराने हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर होते. जनतेला सरकारच्या योजनांचा लाभ पूर्णपणे मिळावा, यासाठी जेटली सदैव प्रयत्नशील असायचे. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे दोघंही विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते. एक कार्यकर्ता ते नेता हा त्यांचा प्रवास अभ्यासण्यासारखा आहे. या सर्वांचा दोन्ही पुस्तकांत योग्य प्रकारे मागोवा घेतल्याचे यानिमित्ताने सांगण्यात आले. या पुस्तकात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या या दोन्ही मान्यवरांबद्दल जनतेला माहित नव्हत्या. ही दोन्ही पुस्तके अभ्यासपूर्वक लिहिली असून दोन्ही नेत्यांच्या कतृत्वाचा यातून नव्या पिढीला परिचय होणार होऊ शकतो असेही सांगण्यात आले.
जोगळेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात, लेखनाचा उपयोग सामाजिक जाणिवेतून केला पाहिजे असे सांगत, मेधा किरिट यांनी ही जाणीव आपल्या लेखनात ठेवल्याचे स्पष्ट केले. स्वराज आणि जेटली, हे दोन्ही व्यक्तिमत्व उत्तुंग होती. त्यांच्या कार्याची या पुस्तकांत अतिशय ओघवत्या भाषेत मांडणी केल्याचेही ते म्हणाले. प्रकाशक आनंद लिमये कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या दोन्ही पुस्तकांच्या विक्रीतून जे मानधन मिळणार आहे, ते स्वराज आणि जेटली यांच्या नावे सुरू असलेल्या संस्थांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश कचरे यांनी केले, आणि डॉ. योगेश जोशी यांनी आभार मानले. त्यावेळी, डॉ. विजय कोंकणे, भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या, नील सोमय्या, लीना मॅथ्यू, मंगला ओक, सुनिती रायकर, भगवान कलावरे, माधव जोशी, मंदिर संस्थानाचे कार्यवाह प्रविण दुधे, दर्शना सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.