आधारवाडी कारागृहातील स्वच्छतागृहात आढळल्या संशयास्पद वस्तू; पोलिसांचीही चुप्पी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 06:45 PM2021-08-09T18:45:04+5:302021-08-09T18:48:04+5:30
आधारवाडी कारागृहात नेमकं चाललयं तरी काय?
कल्याण- कल्याण येथील आधारवाडी कारागृह नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हे कारागृह एक वेगळ्या चर्चेत आले आहे. कारण येथील स्वच्छतागृहातून पोलिसांनी एक मोबाईल फोन, विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नाही तर जेल अधीक्षकांनी सुद्धा संपर्क साधल्यावर कोणातच प्रतिसाद न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्मचा-यांनी शुक्रवारी आधारवाडी कारागृहात अचानक पाहणी केली. यावेळी एका बॅरेकमधील शौचालयात दोन पाण्याच्या ड्रममध्ये लोणच्याचे भांडं नजरेस पडले. जार उघडल्यावर त्यांना त्यात एक मोबाईल फोन, एक इलेक्ट्रिक वायर, 25 ते 30 स्टील पिन, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आणि सीलंटची दोन पाकिटे सापडल्याचे उघड झाले आहे. हे सामान तुरुंगातील बॅरेकमध्ये कसे पोहोचले याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशा संशयास्पद वस्तू कारागृहाच्या आत कशा पोहचल्या ? व त्या कशासाठी जमा करण्यात आल्या होत्या ? हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे.
यासंदर्भात खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे मान्य केले. परंतु याबाबतची अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही तुम्ही कंट्रोल रूममधून माहिती घ्या असे उत्तर दिले. तर वरिष्ठ अधिका-यांनीही आम्ही माहिती देऊ शकत नाही तुम्ही कारागृहाच्या अधिका-यांकडून माहिती घ्या असे सांगत हात वर केले. तर जेल अधीक्षक ए. एस सदाफुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनही इतक्या गंभीर विष्यावर पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ का केली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.